Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Konkan › वाहन चालवताना रस्त्यावरील सर्वांची काळजी घ्या!

वाहन चालवताना रस्त्यावरील सर्वांची काळजी घ्या!

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:20PM

बुकमार्क करा
 

कणकवली : वार्ताहर

वाहतुकीच्या नियमांप्रमाणे प्रत्येकाने काळजीपूर्वक वाहन चालविले पाहिजे. वेळेचे भान महत्त्वाचे आहे. वाहन चालवताना चालकाने रस्त्यावरील सर्वांची काळजी घ्यायला हवी. वेळेचे भान ठेवताना लवकर निघा, वेळेत पोहचा म्हणजे अपघात होणार नाही, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ कणकवली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहिम 25 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अमोल साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील, विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, रा. प. एसटी बँकेचे संचालक विनय राणे, कणकवली आगार व्यवस्थापक विजयसिंह शिंदे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी एम.आर.गोसावी, विभागीय लेखाधिकारी श्री. कांबळे, विभागीय भांडार अधिकारी श्री. बंगडे, आगारातील चालक-वाहक, कर्मचारी तसेच नवीन भरतीतील चालक-वाहक उपस्थित होते. 

सुरक्षितता मोहीम ही केवळ पंधरा दिवसांसाठी नसून ती 365 दिवसांची आहे, असे अशोक करंबेळकर यांनी सांगितले. रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सिंधुदुर्गातही हे प्रमाण वाढत आहे. त्याचे भान गाडी चालवताना राखणे आवश्यक आहे असे विनय राणे यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा अपघात कमी झाले आहेत. परंतु अपघात होतच नाही, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना होणारा त्रास, शारीरिक अपंगत्व येऊन होणारे अपरिमीत नुकसान याची सतत जाणीव ठेवली पाहिजे. आपले व्यक्‍तिगत व प्रवाशांचे नुकसान होऊ नये,याकरिता सर्वतोपरी काळजी घ्या, असे विचार विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी व्यक्‍त केले. अपघातामुळे किती नुकसान होते हे सांगताना मार्गावर गाड्या शांत विचाराने चालवा, इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन अभय खडपकर तर आभार विजयसिंह शिंदे यांनी 
मानले.