Wed, Apr 24, 2019 12:15होमपेज › Konkan › आला पावसाळा, घाटातून सांभाळा

आला पावसाळा, घाटातून सांभाळा

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 10:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पावसाळ्यात जिल्ह्यातील दुर्गम भागात घाटातील दरडी कोसळून अपघात होतात. त्याचप्रमाणे रस्ता बंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने धोकादायक घाट रस्त्यांचे सर्वेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून पावले उचलणे गरजेचे आहे.

जिल्ह्याचा काही भाग पूर्ण डोंगराळ आहे. खेडपासून राजापूरपर्यंत दुर्गम भागात सर्वत्र घाट रस्ते आहेत. यामधील कोयना-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट, आंबा घाट, या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. पर्यटनाबरोबर प्रवासी व माल वाहतुकीसाठी अवघड रस्ते असले तरी या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. मात्र, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांचे अपघातही होतात. पावसाळ्यात या घाटात मोठी वाहतूक असते. चिपळूण रत्नागिरीकडील उद्योगांसाठी अवजड मालाची वाहतूक होते. या सर्व घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दरवर्षी दरडी कोसळण्याच्या व रस्ता खचण्याचे प्रकार घडतात.

घाटांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठे आहे. सुदैवाने दरडी कोसळल्याने जीवितहानी होत नसली तरी वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणावर होतो. या घाट रस्त्यावरुन पावसाळ्यात पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या अधिक असते.

घाटात पर्यटकांची गर्दी असते. अशावेळी दरडी कोसळून घाट बंद झाल्यास पर्यटकांची अडचण होते. दरड कोसळून वाहतूक कोंडी झाल्यास त्या भागाचा संबंधित शहरांशी संपर्क तुटतो. यावर उपाय म्हणून घाट रस्त्यांची डागडुजी व दुरूस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो. परंतु, या आवश्यक कामाचा निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने डागडुजी व दुरुस्तीसाठी मर्यादा येतात. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास सर्वांचीच पळापळ होते. 

निधीची कमतरता असली तरी जिल्हा प्रशासनाने अन्य मार्गाने निधी उभा करून पावळ्यापूर्वी या घाट रस्त्यावरील दरडी कोसळणार्‍या भागाची डागडुजी करणे आवश्यक आहे. तसेच दरड कोसळल्यास ती तातडीने हटवण्यासाठी  यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.