Sat, Mar 23, 2019 02:13होमपेज › Konkan › सांडपाण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी

सांडपाण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 8:53PMकणकवली : शहर वार्ताहर 

कणकवली शहरातील कामत सृष्टी व परबवाडी परिसरात  सांडपाण्याची समस्या, शहरातील बंद फिल्टरेशन प्लांट, 80 लाख खर्चून कामत सृष्टी ते रेल्वेस्थानक परिसरात बांधण्यात आलेले गटार, आदी मुद्यावरून नगरपंचायत सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यामुळे काही काळ सभागृह तंग झाले होते. 

कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा  नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजित मुसळे, गौतम खुडकर, नगरसेविका राजश्री धुमाळे, सुमेधा अंधारी, नंदिनी धुमाळे, माया सांब्रेकर, सुविधा साटम आदी उपस्थित होते.

अभिजीत मुसळे यांनी शहरातील फिल्टरेशन प्लांटचा प्रश्‍न उपस्थित केला. माजी नगराध्यक्षांनी या विषयाचा मोठा गाजावाजा केला होता. तीन फिल्टरेशन प्लान्ट बसविण्यात येणार होते. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून पैसेही जमा करण्यात आले . मग  गेली अडीच वर्षे  याबाबतची कार्यवाही का झाली नाही? सांडपाण्यामुळे शहरातील पन्‍नास टक्केहून अधिक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. असे असतानाही विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष या समस्येकडे का लक्ष देत नाहीत, असे अभिजीत मुसळे यांनी विचारले.

उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर म्हणाले, याबाबत सर्व्हे करण्यासाठी शासन समिती नेमणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याबाबत वरिष्ठस्तरावर आमचा पाठपुरावा सुरु आहे. जमा केलेले पैसेही नगरपंचायतकडेच असून याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. समीर नलावडे यांनी तुम्ही अडीच वर्षे याबाबत काय केले? असा खोचक सवाल श्री. पारकर यांना विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या कन्हैया पारकर यांनी आधीच्या साडेसात वर्षांत तुम्ही सत्ताधारी असताना काय केलात? असे  प्रती सवाल नलावडेंना केला. या वरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात जोरदार जुंपली. कामत सृष्टी ड्रेनेज समस्येबाबत आपण स्वतः लक्ष घालतो असे मुख्याधिकार्‍यानी सांगितले. तर बंडू हर्णे यांनी संबधित गटाराची लेव्हल काढण्यासाठी त्रयस्थ तज्ज्ञ व्यक्तिची नेमणूक करण्याची मागणी केली.  शहरात हॉकर्स झोन  निश्‍चित करण्याचा मुद्दाही चर्चेत आला. याबाबत सभागृहात आता पर्यंत पाच ते  सहा वेळा चर्चा झाली  आहे. मात्र निर्णय झालेला नाही, याकडे रूपेश नार्वेकर यांनी लक्ष वेधले.