होमपेज › Konkan › प्रगत महाराष्ट्राची व्‍यथा : जगण्याचा संघर्ष मरणानंतरही

प्रगत महाराष्ट्राची व्‍यथा : जगण्याचा संघर्ष मरणानंतरही

Published On: Jan 19 2018 12:53PM | Last Updated: Jan 19 2018 12:53PMगिमवी : लक्ष्मीकांत घोणसे-पाटील

जगात एकीकडे चंद्रावर आणि ग्रहावर राहण्याच्या गोष्टी होत आहेत, देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे मात्र, दुसरीकडे स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही ग्रामीण भागात काही ठिकाणी लोकांना पायाभूत सुविधा मिळत नाही. दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीतील दलित समाजाच्या वाडीकडे जाण्यासाठी अद्यापपर्यंत रस्ताच करण्यात आला नाही. येथील प्रत्येक नागरिकाला ये-जा करण्यासाठी डोंगरदर्‍यातून जीवघेणी  पायपीट करावी लागत आहे.

येथील राहणार्‍या माणसांची जशी व्‍यथा आहे तशीच व्‍यथा येथील मृत व्‍यक्‍तिंच्या वाट्यालाही येत असते. मरणानंतरही येथील नागरिकांना मरणयातना भोगव्या लागत आहे. रस्‍ता नसल्याने मृतदेह हा तिरडीवरून घेऊन न जाता तो डोलीतून घेऊन जावा लागत आहे.


येथील अपंग, वयोवृद्ध, आजारी माणसांना डोलीतून डॉक्‍टरकडे घेऊन जावे लागत आहे. येथे राहणार्‍या गरोदर महिलांचा प्रश्न गंभीर आहे. प्रसूतीसाठी येथील महिलांना डोलीतूनच घेऊन जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी असे प्रसंग आले तर नागरिकांना जीवही गमवावा लागण्याची शक्यता येत आहे. रोहिदास वाडीला ये जा करण्यासाठी येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी येथून ये जा करणार्‍या नागरिक पडून जखमी झाले असून अनेकांचे हात पाय मोडले आहेत.  

रोहिदास वाडीच्या रस्‍त्यासाठी १९५२ साली ग्रामपंचायतीने रस्‍त्यासाठी मंजूर दिली. त्यानंतर दोन वेळा निधीही मंजूर करण्यात आला मात्र ना या वाडीला निधी आला, ना रस्‍ता आला. या वाडीच्या रस्‍त्यासाठी अनेक अश्वासने मिळाली असली तरी प्रत्यक्षात मात्र रस्‍ता कुठेच दिसला नाही. यामुळे संगणकाच्या या युगातही येथील नागरिक अजून रस्‍त्‍याच्या प्रतिक्षेत आहेत. 

भोपण रोहिदास वाडीत तीस कुटुंबे राहतात. येथील गावात रस्‍ता, पाणी, लाईट, शाळा सुविधा मिळाल्या मात्र गावातील रोहिदास वाडी विकासापासून वंचित राहिली आहे. वाडीकडे येण्याजाण्यासाठी रस्‍ताच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेला जावे लागते, पावसाळ्यात अवघड रस्‍त्‍यातून जाताना पडून अनेक विद्यार्थी जखमी होतात. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. 

वाडीतील आजार्‍या माणसांना डोलीशिवाय पर्याय नाही. जर कुणी आजारी असेल, अत्‍यावस्‍थ असेल तर प्रश्न गंभीर बनतो. काही वेळा उपचाराअभावी येथील माणसांना जीव गमवावा लागला आहे. आजारी, वयोवृध्द, गर्भवती महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी येथील नागरिकांना सध्या डोलीशिवाय पर्याय नसल्याने आमच्या पुढच्या पिढीला तरी शासन मदत देणार का असा सवाला येथील नागरिक उपस्‍थित करीत आहेत. 

आजारी व्‍यक्‍तिला डोलीतून घेऊन जात असताना डोली वाहकालाही येथे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अंतर मोठे असल्याने, डोंगर उताराने जाताना वेदना सहन करतच रुग्णांना डोलीतून रुग्णालयात दाखल करावे लागते.

भोपण रोहिदास वाडीतील रस्‍ता १९५२ साली ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. मात्र अजूनही येथे रस्‍ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे रस्‍ता नसल्याने मोठे नुकसान होत आहे. सध्या गावाच्या विकासासाठी आम्‍ही सर्व प्रयत्‍न करून या रस्‍त्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्याचे सरपंच सुरेश शिगवण यांनी सांगितले.

भोपण रोहिदास वाडीला रस्‍ता नसल्याने जीवघेणी पायपीठ करावी लागते. पावसाळ्यात वाटेवरून पाणी वाहत असल्याने जीवघेणी कसरत करीत रस्‍त्याने उतरावे लागते. जशी येथे जीवंत माणसांची व्‍यथा आहे तशीच येथे एकाद्याचा मृत्यू झालावरही एक मोठी व्‍यथा आहे. येथे रस्‍ताच नसल्याने प्रेताला तिरडीवरून घेऊन न जाता प्रेतही डोलीतूनच स्‍मशानभूमीकडे घेऊन जावे लागते. 

आम्‍हाला मरणानंतरही चार माणसांच्या खांद्यावरून जाण्याचं भाग्य आम्‍हाला मिळत नाही असं येथील नागरिक सांगतात. 

भोपण ग्रामपंचायतीने तात्काळ गावाची ग्रामसभा लावून  रोहिदास वाडीची रस्त्याची गरज दूर करणे गरजेचे असल्याचे  हरिश्चंद्र आंबेकर सांगतात. रस्‍त्‍याच्या सुरूवातील ज्यांची जागा आहे त्यांच्यामुळेही रस्‍ता निर्मितीस अडचणी निर्माण झाल्या आहेत असे येथील नागरिक सांगतात.