Thu, May 23, 2019 14:30
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘कोण म्हणतो देणार नाही’... मराठा आक्रमक!

‘कोण म्हणतो देणार नाही’... मराठा आक्रमक!

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:22PMकणकवली : वार्ताहर

आरक्षण आमच्या हक्‍काचे, कोण म्हणतो देणार नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत कणकवलीत मराठा आंदोलक गुरूवारी रस्तावर उतरले होते. महामार्गावर टायर पेटवून, झाडे तोडून टाकत, सिमेंट पाईप-लोखंडी पोल टाकत वाहतूक रोखण्यात आली. कणकवलीसह फोंडाघाट, खारेपाटण, तळेरे, कासार्डे, कनेडी, नांदगाव आदी बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कणकवली मुख्य चौकात आंदोलन करत वाहतूक रोखण्यात आली. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको थांबविण्यात आला.

मराठा आंदोलनाच्या हालचाली तालुक्याच्या गावागावात गुरूवारी पहाटेपासूनच सुरू झाल्या होत्या. आंदोलनाचा एसटी गाडयांना फटका बसू नये म्हणून वस्तीच्या गाडया सकाळी लवकर कणकवली डेपोत दाखल झाल्या. सकाळी 8 वा. पासून कणकवलीसह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये मराठा आंदोलक एकत्र येवू लागले. आंदोलनाचा भडका लक्षात घेवून सकाळपासूनच तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील अंतर्गत रस्ते तसेच महामार्गावर ठिकठिकाणी मराठा आंदोलक एकत्र येत होते. वागदे, बेळणे, नांदगाव, कासार्डे येथे सकाळी 8 वा. पासूनच आंदोलकांकडून वाहतूक रोखण्यास सुरूवात झाली. 

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ सकाळी 8 वा. पासूनच मराठा आंदोलकांची गर्दी वाढू लागली होती. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत मराठा येत होते. 10 वा. आंदेालकांनी कणकवली शहरात मोटारसायकल फेरी काढली. त्यानंतर पुन्हा शिवाजी चौकात येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांच्या गर्दीमुळे महामार्ग व्यापून गेला होता. महिलाभगिनीही मोठया संख्येेने सहभागी झाल्या होत्या. एस. टी.सावंत, लवू वारंग, रवींद्र गायकवाड, योगेश सावंत, शैलेश भोगले, सुशांत नाईक, भास्कर राणे, सोनू सावंत, सुशील सावंत, विठ्ठल देसाई, किशोर राणे,  अ‍ॅड. हर्षद गावडे, दामू सावंत,गंगाधर सावंत आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.   

चौकात महामार्ग रोखला

शिवाजी चौकात जमलेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा शहरातील मुख्य चौकाकडे वळविला. शिवाजी चौक ते पटवर्धन चौक पर्यंत झालेल्या रॅलीनंतर महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. दुपारी 12 वाजता महामार्ग रोखण्यात आला. जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर 12.30 वा. प्रभारी तहसीलदार पी. बी. पळसुले आंदोलनस्थळी पोहोचले. आंदोलकांकडून शासनाला देण्यासाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी पुन्हा शिवाजी चौकात जावून जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. आंदोलनासाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानण्यात आले. 

कणकवलीसह फोंडाघाट, तळेरे, नांदगाव, कनेडी येथे आंदोलनाचा  डोंब कोसळला होता. फोंडाघाटमार्गावर सकाळी झाडे तोडण्यात आल्याने वाहतूक बंद झाली. बेळणेत दगड रचून महामार्ग रोखला होता. कनेडी बाजारपेठेत आंदोलकांनी एकत्र येत वाहतूक रोखली तर तळेरे, नांदगाव येथे आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी केली. तालुक्याच्या गावागावात मराठा बांधवांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस फौज आंदोलकांना रोखण्याबरोबरच अडथळे बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत होती.

टायर पेटविले, झाडे तोडली

कणकवलीसह वागदे, जानवली, ओसरगाव, बेळणे या भागात आंदोलकांकडून महामार्गावर ठिकठिकाणी टायर पेटवून तसेच झाडे तोडून टाकत वाहतूक रोखण्यात येत होती. बेळणेत महामार्गावर दगड रचण्यात आले तर जानवली पूल, गडनदी पूल, वागदेत उभादेव मंदिरजवळ, गावठणवाडी, ओसरगाव पोस्ट, कसाल पूल आदी ठिकाणी वाहतूक रोखण्यात येत होती.  

महामार्गावर तुरळक गाडया

महामार्गावर उतरत सकाळपासून मराठा आंदोलकांकडून वाहतूक रोखण्यात येत होती. अनेक ठिकाणी अडथळे निर्माण केले जात होते. आंदोलनाचा भडका उडत असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गावर सकाळपासूनच तुरळक गाडया सुरू होत्या. 

शाळा, महाविद्यालय बंद

कणकवली तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा, महाविद्यालय गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. एसटी गाडया व प्रवासी वाहने बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येणे शक्य होणार नसल्याने शिक्षण संस्थांनकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आला होता. मराठा आंदोलनाला रिक्षा, टेम्पो संघटना, वाहतूकदार संघटना तसेच विविध समाज संघटनांनी पाठिंबा दिला होता.