Thu, Apr 18, 2019 16:32होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : दुचाकींची धडक ; बालिकेसह स्वार गंभीर

सिंधुदुर्ग : दुचाकींची धडक ; बालिकेसह स्वार गंभीर

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:35PMसाटेली-भेडशी : वार्ताहर

तिलारी-दोडामार्ग राज्यमार्गावर साटेली-भेडशी येथील करुणा सदन स्कूलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सानवी मोरजकर (वय 8) व मोटारसायकलस्वार व सैजाद अली असे दोघे जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

मोटारसायकलस्वार भाऊ मोरजकर (40) हे मुलगी सानवी हिला शाळेत सोडण्यासाठी मोटारसायकलवरून येत होते. ते करुणा सदन स्कूलसमोर आलेले असता त्यांच्या मोटारसायकलला मागून येणार्‍या सैजाद अली यांच्या मोटारसायकलची धडक बसली. यामुळे मोटारसायकलवरील कु. सानवी ही स्कूलच्या सिमेंट कठड्यावर आदळली. तिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. भाऊ मोरजकर हे सुदैवाने बचावले. दुसरा मोटारसायकलस्वार सैजाद अली याच्या पायावर मोटारसायकल पडल्याने तेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी या दोघांनाही तत्काळ साटेली-भेडशी प्रा.आ. केंद्रात दाखल केले. मात्र, सानवी हिची दुखापत तीव्र असल्याने प्रथमोपचारानंतर तिला अधिक उपचारांसाठी गोवा-म्हापसा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सैजाद अली यांच्यावर प्रा.आ. केंद्रात उपचार सुरू आहेत. 

दोडामार्ग-तिलारी मार्गावर करुणा सदन स्कूलसमोर दोडामार्गच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर गतिरोधक आहेत. मात्र, तिलारीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर गतिरोधक नाहीत. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. तिलारी मार्गावरही गतिरोधक टाकावेत, यासाठी ग्रामस्थ व पालकांनी सातत्याने मागणी करूनही सा.बां. विभाग दुर्लक्ष करत आहे. याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान पालकांच्या मागणीनुसार शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी  शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक ठेवण्यात येणार असल्याचे प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.