Thu, Apr 25, 2019 05:43होमपेज › Konkan › प्रभाते मनी..नद्यांना श्‍वास घेऊ द्या

प्रभाते मनी..नद्यांना श्‍वास घेऊ द्या

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:05PMविशाल मोरे,

नद्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. झोपडपट्ट्यांतून टाकण्यात येणारे सांडपाणी, नदीकिनारच्या कारखान्यातून सोडण्यात येणारे रासायनिक पाणी यामुळे नद्यांतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तेथील जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. नद्यांचे बकाल स्वरूप जाऊन नद्यांच्या पात्रातील भूजलाची पातळी वाढवणे, झोपडपट्टीतील सांडपाणी, कारखान्यातील रासायनिक पाणी, गाळे व तबेल्यातील सांडपाणी यावर पर्याय निघणे गरजेचे आहे.

जलसंवर्धनासाठी त्याचप्रमाणे नद्यांच्या काठाचे सुशोभिकरण करण्याची खरी गरज आज आहे. प्राचीन काळापासून माणसाने आपल्या वसाहती नदीकाठी का वसवल्या याचे उत्तर म्हणजे पाणी. पूर्वी नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याने हे पाणी थेट पिण्यासाठी वापरण्यात येत असे. आता मात्र चित्र बदलले आहे. नदी पात्रात कपडे धुणे, जनावरे धुणे, कचरा व निर्माल्य टाकणे, कारखान्यांचे सांडपाणी सोडणे, नागरीवस्तीचे सांडपाणी सोडणे, गाड्या धुणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकी, थ्री व्हीलर, बसेस, ट्रॅक्टर, जीप, कार, टेम्पो आदी वाहने धुण्याचा उपक्रम राजरोसपणे सुरु असतो. यामध्ये कॉस्टिक सोडा, निरमा, साबण लिक्विड सोप, शाम्पू पुड्यांचा वापर गाड्या धुण्यास केला जात आहे. अनेक वाहने नदी पात्रात धुतल्यामुळे पाण्यातील जैव साखळीवर गंभीर परिणाम होत आहे. वाहने धुतलेल्या पाण्यामुळे जलचर प्राण्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. तसेच, पाणी प्रदुषणात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 

नद्यांतील  वाळूचा  नको  तेवढा उपसा करून ती काँक्रिटी करणासाठी वापरण्यात येत आहे. नद्यांची पात्रे उघडी पडत आहेत. त्याशिवाय कारखान्यांतून उत्सर्जित होणारी दूषित द्रव्ये, सांड-पाण्याची गटारे नद्यांना काळेशार डोह बनवत आहेत. तहानेने व्याकुळलेल्या जीवांना हे विष पचवणे भाग पडते आहे. नद्यातील पाण्याचा वापर अनेक ठिकाणी पिण्यासाठी करण्यात येतो. मात्र, प्रदूषित पाणी पिल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी प्रदूषित होतेय. परंतु, नदीकाठी नागरिकांना कोणीही प्रतिबंध करत नसल्याने नदीतील पाणी अधिकच प्रदूषण होण्यास मदत होत आहे. 

राज्य शासन, महापालिका प्रशासनाने शहरातील नद्यावर कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना केलेली नाही. प्रदूषण रोखण्यास काहीही अंमलबजावणी केलेली नाही. नद्यांचे प्रदूषण दूर करून त्यांचे पुनरुज्जीविकरण तसेच सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारं सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबवला पाहिजे. नद्या स्वच्छ करतानाच भविष्यात या नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी संबंधित महापालिका, नगरपालिका यांच्यावर कायदेशीर बंधन घालण्यात यावीत. तसेच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील दूषित पाणी नदीत सोडणारे कारखाने यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

प्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यासाठी यंत्रणाही कठोर आवश्यक आहे. सांडपाणी आणि कचर्‍याचं प्रमाण शून्यावर आलं की, या नद्या मोकळा श्‍वास घेऊ शकतील. तसंच, नद्यांमध्ये उभारण्यात आलेलं काँक्रिटचं बांधकाम जमिनदोस्त केलं पाहिजे. नद्यांभोवती त्यांच्या नैसर्गिक आधिवासाला पुन्हा उमलू देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यावर अवलंबून असलेलं प्राणीजीवन तिथं पुन्हा अस्तित्वात येईल. प्रदूषणमुक्‍त नद्या होण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्यास शहरातील जीवन वाहिन्या निश्‍चितच मोकळा श्‍वास घेण्यास मदत होईल.