Mon, Jul 22, 2019 04:57होमपेज › Konkan › क्षेत्र घटले तरी भात उत्पादन सरसच

क्षेत्र घटले तरी भात उत्पादन सरसच

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 9:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आतबट्ट्याचा झालेला शेतीव्यवसाय, जमिनींचे वाढलेले दर आणि नैसर्गिक मर्जीवर अवलंबून असलेली कोकणातील शेती यामुळे जिल्ह्यातील खरीप लागवडीच्या एकूण उद्दिष्टापैकी सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. तरीही भाताची उत्पादकता वाढली असल्याचे मत जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस.जगताप यांनी व्यक्‍त केले.

कोकणात खरिपाची शेती केली जाते तर रब्बी हंगामात शेती करण्याकडे कोकणातील शेतकरी उत्साही नाही. मात्र, नव्या तंत्राचा वापर केल्याने क्षेत्र घटले तरी उत्पादकता मात्र हेक्टरी 800 किलोंनी वाढले आहे.

कोकणात खरिपात अनिश्‍चित पावसाच्या वेळापत्रकावर आधारित भातशेती करण्यात येेते. भातपिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण व दमट असे अनुकूल हवामान कोकणात आहे. त्यातही सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे क्षेत्र घटले तरी उत्पादकता मात्र सरस ठरत आहे.  

विविध कारणांमुळे भातशेतीकडे पाठ

गेल्या खरीप  हंगामात जिल्ह्यातील एकूण सव्वालाख क्षेत्रापैकी  74 हजार 738 हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले  होते. प्रत्यक्षात 68 हजार 194 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली. पावसाची अनियमितता, लहरी हवामान, पूरपरिस्थिती आणि वन्यप्राण्यांकडून होणारा त्रास आदी विविध कारणांमुळे शेतकरी भातशेतीकडे पाठ फिरवित आहेत.  त्यामुळे भातशेतीचे क्षेत्र एका वर्षात साडेसहा हजार हेक्टरनी कमी झाले. मात्र, तरीही पारंपरिक शेतीला  आधुनिकतेची जोड मिळाल्याने भाताच्या उत्पादनात वाढ होत आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.  पूर्वी हेक्टरी 2300 किलो भाताचे उत्पादन घेतले जात होते; मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनामुळे हेक्टरी 3100 किलो भाताचे उत्पन्न घेतले जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी हेक्टरी 800 किलो भाताचे अधिक उत्पन्न  घेत आहेत. 

शेतकर्‍यांना थेट बांधावर मार्गदर्शन

बदलत्या वातावरणानुसार कृषी विभागाने विविध गुणधर्मांच्या जाती विकसित केल्या आहेत. विकसित करण्यात आलेल्या जातींमध्ये उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना हायब्रीड बियाणे, खत व्यवस्थापन, चारसूत्री लागवडी बरोबरच सगुणा पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना उद्युक्‍त केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जास्तीत-जास्त भातपिकाचे उत्पादन मिळविण्यासाठी किती खत वापरले जावे, भात लावणीच्या वेळी आणि लावणीनंतर त्याचे प्रमाण किती असावे, लावणीनंतर पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना थेट बांधावर देण्यात आल्याचे कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी सांगितले.