Sun, Aug 18, 2019 14:59होमपेज › Konkan › बस फलाटावर चढल्याने निवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू

बस फलाटावर चढल्याने निवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:52PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर

वेंगुर्लेतून सावंतवाडीकडे जाणारी एस.टी. बस वेंगुर्ले आगारात गाडी लावताना चालकाचा ताबा सुटून बस फलाटावर चढल्याने झालेल्या अपघातामध्ये मातोंड येथील निवृत्त प्राध्यापक रमाकांत बाळकृष्ण शिरोडकर (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तेथे उभे असलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थीही गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.

खानोली-समतानगर येथील शार्दुल धोंडू खानोलकर (20) व अणसूर-देऊळवाडी येथील वर्षा विष्णू गावडे (19) एस.टी. बसच्या धडकेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वेंगुर्लेकडून पाल-मातोंड मार्गे सावंतवाडीकडे जाणारी (एम.एच. 14 बीटी 0265) बस चालक सिताराम कृष्णा तुळसकर हे आगारातून बाहेर आणून फलाटावर लावण्यासाठी नेत होते. मात्र, गाडीवरचा ताबा सुटल्याने बस सरळ फलाटावर चढून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी लावलेल्या लोखंडी रॉडला धडकली. यावेळी रॉड शेजारी मातोंड येथे आपल्या घरी जाण्यासाठी उभे असलेले रमाकांत शिरोडकर यांना बसचा धक्का बसताच ते जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी त्यांच्या शेजारी उभे असलेले विद्यार्थी शार्दुल खानोलकर व वर्षा गावडे यांनाही धक्का लागल्याने ते जमिनीवर कोसळून जखमी झाले आहेत. या घटनेमुळे उपस्थित प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना तत्काळ वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

वैद्यकीय अधिकार्‍यांनी शिरोडकर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर अन्य दोन प्रवाशांवर उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी जखमी शार्दुल खानोलकर याच्या तक्रारीवरुन चालक तुळसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत खोत करीत आहेत.