Thu, Jul 18, 2019 04:05



होमपेज › Konkan › ‘जिंदाल’च्या माध्यमातून उर्वरित शाळाही होणार डिजिटल

‘जिंदाल’च्या माध्यमातून उर्वरित शाळाही होणार डिजिटल

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:59PM



कणकवली : प्रतिनिधी  

कणकवली विधानसभा मतदार संघातील शाळा डिजिटल करुन आधुनिक शिक्षण पद्धतीला जोडण्याची मोहिम आ.नितेश राणे यांनी हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात टाटा कंपनीच्या माध्यमातून 100 शाळा डिजिटल केल्यानंतर आता जिंदाल ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून उर्वरित शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. आ.नितेश राणे यांनी कंपनीला दिलेल्या प्रस्तावानुसार सोमवारी जिंदाल कंपनीचे सीएसआर असिस्टंट जनरल मॅनेजर सुधीर तेलंग यांनी ओम गणेश निवासस्थानी आ.नितेश राणे यांची भेट घेतली व कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील भौगोलिक, शैक्षणिक स्थितीची माहिती जाणून घेत शाळा सर्वेक्षणाचे कामही सुरु केले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच या मतदारसंघातील उर्वरित शाळाही डिजिटल करण्यात येणार आहेत. 

टाटा, महिंद्रा आणि रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथे विविध विकासात्मक उपक्रम आ.नितेश राणे यांनी सुरु केले आहेत. या विकास प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणून जिंदाल ग्रुप ऑफ कंपनीचा सहभाग शाळा डिजिटल करण्यासाठी घेतला जाणार आहे. कंपनीनेही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आ.नितेश राणे यांनी सुचित केलेल्या शाळा डिजिटल करण्यासाठी शाळा सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे. त्यानुसार जिंदाल ग्रुपचे काम सुरु झाले असून उर्वरित शाळा डिजिटल झाल्यानंतर या मतदारसंघात शैक्षणिक क्रांतीचे नवे पाऊल उमटणार आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातही आधुनिक शिक्षण पद्धती असावी. प्राथमिक शाळेपासूनच मुलांना संगणकीय ज्ञान व्हावे यासाठी आ.नितेश राणे आग्रही आहेत. पहिल्या टप्प्यात टाटा कंपनीच्या माध्यमातून 100 शाळा डिजिटल केल्यानंतर जिंदाल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सज्जन जिंदाल यांच्याकडे शाळा डिजिटल करण्यासाठी कंपनीचा सीएसआर फंड मिळावा, अशी मागणी केली होती.