Thu, May 28, 2020 22:43होमपेज › Konkan › रिफायनरीविरोधात आज मुंबईत मोर्चा

रिफायनरीविरोधात आज मुंबईत मोर्चा

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:52PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

विविध मार्गाने आंदोलने उभारुनदेखील शासनाला फरक पडत नसल्याने संतप्‍त रिफायनरी विरोधक  8 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. त्यामध्ये बागायतदार, शेतकरी, मच्छीमार  यांच्यासह शिवसेनाही सहभागी होणार आहे. कोकण विनाशकारी रिफायनरीविरोधी संघटनेच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने प्रकल्पातील संपादित जागेची मोजणी हाती घेतली होती. त्यावेळी संघटित झालेल्या प्रकल्प विरोधकांनी जोरदार विरोध करीत मोजणी रोखून धरली होती. अखेर प्रशासनच हतबल ठरले होते तर राजापुरात येऊन गेलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण जनतेसमवेत आहोत, असे सांगून प्रकल्पाला विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेतदेखील उद्धव ठाकरेंनी रिफायनरीला विरोध केला होता.

सर्व घडामोडीनंतर सेनेच्या विरोधी भूमिकेमुळे आता रिफायनरीचे काय होणार, असे प्रश्न निर्माण झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत सेनेचे आमदार राजन साळवींनी रिफायनरीला जोरदार विरोध करीत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती; पण मुख्यमंत्री मात्र प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिफायनरीवरुन उठलेले मोहोळ काही शमण्याच्या स्थितीत नसल्याची चाहूल त्याचवेळी वाटू लागली असताना आता कोकण विनाशकारी रिफायनरीविरोधी संघटनेच्या वतीने 8 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाची तयारी सुरु केली आहे. आपला प्रखर विरोध दर्शवून रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी आक्रमक प्रकल्प विरोधकांनी घेतल्याने सुरु असलेले रण काही थांबण्याच्या स्थितीत नाही. शिवसेनाही यात सहभागी होणार असल्याने या मोर्चाला गर्दी होण्याची शक्यता आहे.