Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Konkan › नाणार प्रकल्पावरून स्थानिकांत धुमश्‍चक्री

नाणार प्रकल्पावरून स्थानिकांत धुमश्‍चक्री

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:40AM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. आपल्याच गावात येऊन आपल्या विरोधात वक्‍तव्य का करता, याबाबत जाब विचारण्यास गेलो असता, खुर्ची डोक्यावर घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कुंभवडे येथील ग्रामस्थ पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर यांनी राजापूर पोलिसांकडे केली आहे.

तर, कुंभवडे येथे बैठक सुरू असताना सभेत घुसून आपल्या पतीला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या पत्नी अश्‍विनी यांनी दिली आहे.  कुंभवडे हायस्कूलमध्ये रविवारी रिफायनरीसंदर्भात काही प्रकल्पग्रस्तांची बैठक सुरू होती. या बैठकीला अशोक वालम यांच्यासह अन्य काही मंडळी उपस्थित होती. पंढरीनाथ आंबेरकर दलाली करतात,जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात, रिफायनरी विरोधातील बैठकांना उपस्थित राहत नाहीत, असे अशोक वालम या बैठकीत सांगत होते.

त्यामुळे याबाबत आपण बैठकीच्या ठिकाणी वालम यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता अशोक वालम, त्याची पत्नी व मंगेश चव्हाण यांनी आपल्या डोक्यात खुर्ची घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘तुझे घर उद्ध्वस्त करतो, तुझ्या लक्झर्‍या फोडून टाकतो, तुला ठार मारतो,’ अशी धमकी दिल्याची तक्रार आंबेरकर यांनी राजापूर पोलिसांकडे दिली आहे. आंबेरकर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पंढरीनाथ आंबेरकर, मेघनाथ आंबेरकर, ज्ञानदीप आंबेरकर, संदीप नारायण पांचाळ, अरुण आंबेरकर यांच्याविरुद्ध वालम यांनी तक्रार दिली आहे.