Mon, Apr 22, 2019 16:09



होमपेज › Konkan › बड्या उद्योगपतीसाठी ‘रिफायनरी’चा घाट

बड्या उद्योगपतीसाठी ‘रिफायनरी’चा घाट

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 9:11PM



लांजा : प्रतिनिधी 

केंद्रातील एका मोठ्या मंत्र्याच्या मर्जीतील उद्योगपातीला क्रूड ऑईल टर्मिनल उभारायचे असल्यामुळेच रिफाईनरी प्रकल्प राजापुरात आणण्याचा घाट घातल्याचा घणाघाती आरोप रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केला. 

खा. राऊत लांजा शासकीय विश्रामगृहात रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले की, केंद्राच्या कायद्याप्रमाणे 70 टक्के लोकांची अशा प्रकल्पाला सहमती आवश्यक असते. परंतु, या ठिकाणी 75 टक्के लोकांनी असहमती पत्रे भरून शासनाकडे दिली आहेत. असे असताना हा प्रकल्प लोकांवर लादला जाणार नाही. मात्र, यामागे मुख्यमंत्र्यांचा हट्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा हट्ट असला तरी त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की हा प्रकल्प लादला जाणार नाही, तो शब्द ते पाळीतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

कोकणचे नेते नारायण राणे याच्यावर आरोप करताना राऊत म्हणाले की, स्वाभिमान पक्षाच्या तालुकाध्यक्षाने किती एकर जागा घेतली आहे ते आम्ही दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या आश्रयाखाली एका तथाकथित पश्‍चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने 2200 एकर जागा कशी घेतली आहे, हेही आम्ही दाखवून दिले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, आम्ही त्यांना दोन वेळा आव्हान दिले आहे. गुजरातमधील भू माफियांकडून या भागात मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी व्यवहार सुरू आहेत. सुमारे 122 परप्रांतीय लोकांनी जमीन खरेदीचे व्यवहार केले असून काही राजकारणी लोकांचे नातेवाईक या व्यवहारात गुंतले आहेत. यामुळे आम्ही मुख्यमंत्री यांना भेटलो असून या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तशी चौकशी करण्याचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या सोबत आ. राजन साळवी, जगदीश राजपकर, संदीप दळवी, जया माने, सभापती दीपाली दळवी, नगराध्यक्ष सुनील कुरूप आदी उपस्थित होते.