Sun, Jan 19, 2020 21:46होमपेज › Konkan › रिफायनरी आंदोलनाला वालम यांच्याकडून हिंसक वळण

रिफायनरी आंदोलनाला वालम यांच्याकडून हिंसक वळण

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:15PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलने सनदशीर मार्गाने  व शांततेने सुरु असतानाच कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी त्याला हिंसक वळण दिले. त्यामुळेच कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. वालम यांची ही कृती निंदाजनक असून त्यांची भडकावू भाषणे लक्षात घेता शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी येथील माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत  केली.

रविवारी कुंभवडे येथे रिफायनरी प्रकल्पावरुन हाणामारी झाल्याच्या पार्श्‍वमीवर माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर हे पत्रकारांशी बोलत होते. शासनाने जनतेवर लादलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आमचाही कडाडून विरोध आहे. संविधानाने आखून दिलेल्या अशा सनदशीर मार्गाने हा लढा लढला जावा, अशी आमची अपेक्षा असताना कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला ती कृती निश्‍चितच निंदाजनक आहे. गेल्या काही महिन्यांत आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करताना वालम यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वत:च्या पक्षप्रमुखांवर ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर टीका केली ती पद्धतही अत्यंत चुकीची असल्याचे पेडणेकर  म्हणाले.

प्रकल्पग्रस्थांचे नेतृत्व करताना भडकावू भाषणे करायची व कायदा- सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे प्रयत्न करायचे, असे प्रकार वालम यांच्याकडून झाले आहेत. त्याची साक्ष देणारे त्यांच्या भडकावू भाषणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी वालम यांची वक्‍तव्ये तपासावीत व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. यावेळी विलास पेडणेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अशोक वालम यांच्या कृतीचा जोरदार निषेध केला.