Thu, Mar 21, 2019 23:30
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मालवणनगरी पर्यटकांनी बहरली...

मालवणनगरी पर्यटकांनी बहरली...

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:07PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी   

नाताळ सुट्टीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांनी मालवणनगरी बहरून गेली आहे. रविवारी ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला विक्रमी 12 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्याचे दिसून आले आहे. शहरातील चिवला बीच, बंदर जेटी, रॉकगार्डन परिसर तसेच तारकर्ली, देवबाग येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास पर्यटकांची तुफान गर्दी पहावयास मिळत आहे.

नाताळसह इअर एंडिंग सेलिब्रेशनसाठी गेल्या दोन दिवसांत मालवणात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गसह स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग तसेच अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास गर्दी होत आहे. सोमवारी दुसर्‍या दिवशीही किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हजारो पर्यटकांची गर्दी बंदर जेटीवर झाल्याचे दिसून आले. बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या वाहनांनी फुलून गेला होता. दांडी येथे साकारण्यात आलेल्या दांडी सी वॉटरपार्कच्या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बंदर जेटी परिसर पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

शहरातील चिवला बीच समुद्र किनारा हा सुरक्षित किनारा म्हणून ओळखला जातो. हा किनाराही गेले दोन दिवस पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. शहरात पर्यटकांसह राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली दाखल झाल्या आहेत. चिवला बीच समुद्रात विविध शाळकरी मुले समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यात मग्‍न असल्याचे दिसून आले. 

 शहरात वाहतूक  कोंडी

 शहर परिसर वगळता तारकर्ली, देवबाग येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. शहरासह तारकर्ली, देवबागकडे जाणार्‍या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहरातील प्रमुख मार्गावर तसेच तारकर्ली, देवबाग मार्गावर जादा वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. मात्र तारकर्ली, देवबाग येथील अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी जाताना दीड ते दोन तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे तारकर्ली, देवबाग गावातील व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

पर्यटकांच्या निवार्‍याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी व्यावसायिकांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल्स, लॉजिंग, निवास न्याहारी तसेच अन्य पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आहे. मासळीचे दर आवाक्यात असल्याने मत्स्य खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे बाजारपेठेतही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. 

नववर्षापर्यंत मालवण हाऊस फुल्ल!

नाताळ तसेच नवीन वर्षाचे स्वागत, असा दुहेरी आनंद साजरा करण्याच्या हेतूने काही पर्यटक कुटुंबांसह मालवणात  दाखल झाले आहेत. यामुळे शहरातील सर्वच लॉजिंग- बोर्डिंग व पर्यटक निवास हाऊस फुल्ल झाले आहेत. या पर्यटकांनी महिना- दोन महिने मालवण सफरीचे नियोजन करुन ऑनलाईन हॉटेल बुकिंग केली आहेत.  पर्यटकांकडून स्थानिक मच्छी भोजनाला पंसती मिळत आहे.