होमपेज › Konkan › ‘रत्नदुर्ग’ सांगणार जलदुर्गांचा इतिहास!

‘रत्नदुर्ग’ सांगणार जलदुर्गांचा इतिहास!

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 10:46PMरत्नागिरीः प्रतिनिधी

शहराच्या पश्‍चिमेला असणार्‍या व पर्यटनाचा ‘क’ दर्जा प्राप्त रत्नदुर्ग किल्ल्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, भगवती देवीचे दर्शन आणि बालेकिल्‍ला पाहून ते लगेच माघारीही फिरतात. पर्यटक येथे दिवसभर थांबावेत आणि त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने येथील उद्यानामध्ये 4  कोटी खर्च करून 7 जलदुर्ग आणि 1 गिरीदुर्ग यांच्या हुबेहूब प्रतिकृतींचे ‘दुर्गरत्न’ उभारण्यात येणार असून त्यातून पर्यटकांना किल्ल्यांचा इतिहास समजणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  

पर्यटनाच्या द‍ृष्टीने मागील काही काळात रत्नागिरीत विविध प्रकल्प उभारले जात आहेत. त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या स्कुबा डायव्हिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्‍लायबिंग, नौका पर्यटन आदींना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. पर्यटक रत्नागिरीत जास्तीत -जास्त वेळ फिरावेत आणि त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने रत्नदुर्ग किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. 
रत्नदुर्ग किल्ल्यात   नगर परिषदेच्या मालकीचे गार्डन आहे. सद्य:परिस्थितीत या गार्डनची दुरवस्था झाली आहे. या गार्डनच्या 1 ते दीड एकर परिसरात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. प्रत्येक प्रतिकृती 2 हजार स्क्‍वेअर फूट जागेत उभारण्यात येणार असून या प्रतिकृतींच्या तटांवरून पर्यटकांना  चालत किल्ल्यांची माहिती घेता येणार आहे. किल्ल्यांबाबत माहिती देणारे फलकही उभारण्यात येणार आहेत. द‍ृकश्राव्य माध्यमातूनही किल्ल्यांची माहिती देण्यात येणार आहे. मोठ्या आकाराची म्युरल्स, झुलते पूल, खंदक आणि भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची माहिती देणारे छोटे म्युझियमही उभारण्यात येणार आहे. उद्यानाची प्राकृतिक रचना लक्षात घेऊन या प्रतिकृतींची उभारणी करण्यात येणार आहे. वर्षाचे बाराही महिने आणि रात्रीही या प्रतिकृती पाहता येतील, अशा प्रकारे विद्युत योजना करण्यात येणार आहे.

याचबरोबर किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या दिंडी दरवाजाकडे जाण्यासाठी पाखाडी बांधण्यात येणार आहे. प्रवेशाच्या ठिकाणच्या ढासळेल्या तटबंदीची पुन्हा बांधणी करण्यात येऊन आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. याद्वारे हनुमान मंदिर ते दीपगृह हा तटावरील मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी स्थानिकांचे सर्व प्रकारचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष पंडित यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका रशिदा गोदड, बंटी कीर, कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.