Thu, Apr 25, 2019 13:53होमपेज › Konkan › जि.प. विषय समिती सभापतींची निवड

जि.प. विषय समिती सभापतींची निवड

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी सहदेव बेटकर, आरोग्य व बांधकाम सभापतिपदी विनोद झगडे, समाजकल्याण सभापतिपदी प्रकाश रसाळ आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी साधना साळवी यांची निवड करण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या 55 सदस्यांपैकी 39 सदस्य शिवसेनेचे आहेत. पाच वर्षांच्या कालावधीत जास्तीत जास्त सदस्यांना सभापतिपद मिळावे म्हणून प्रत्येक सभापतीसाठी सव्वा वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षांसाठी शिक्षण व अर्थ सभापतीपदी दीपक नागले, आरोग्य व बांधकाम सभापतीपदी अण्णा कदम, समाजकल्याण सभापतीपदी चारुता कामतेकर आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी  ॠतुजा खांडेकर यांना संधी देण्यात आली होती. सव्वा वर्षांची टर्म पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जि. प. अध्यक्षांकडे सुपूर्द केला. रिक्त झालेल्या सभापतीपदी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. 

यावेळी समाजकल्याण सभापती पदासाठी प्रकाश रसाळ आणि परशुराम कदम यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या वेळेत परशुराम कदम यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने प्रकाश रसाळ यांची निवड जाहीर करण्यात आली. उर्वरित तीन सभापती पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी जाहीर केली.