Fri, Nov 16, 2018 02:24होमपेज › Konkan › रत्नागिरीत डिझेलअभावी एस.टी.ला लागला ‘ब्रेक’

रत्नागिरीत डिझेलअभावी एस.टी.ला लागला ‘ब्रेक’

Published On: Aug 11 2018 10:33PM | Last Updated: Aug 11 2018 10:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

डिझेल संपल्याने रत्नागिरी एस.टी. आगारातून शनिवारी शहरी आणि ग्रामीण फेर्‍यांमधील 225 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. यामुळे अनेक प्रवासी एस.टी. स्थानकावरच अडकून पडले होते. शाळा सुटल्यावर गाड्या वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. अन्य आगारातून डिझेल मागवण्यात येऊन काही फेर्‍या सोडण्यात आल्या. सायंकाळी डिझेलचा टँकर आल्यावर सर्व फेर्‍या सुरळीत सुरू झाल्या.

रत्नागिरी विभागाला मिरज येथून डिझेल पुरवण्यात येते. रत्नागिरी आगाराला दिवसाला 7 ते 8 हजार लिटर डिझेल लागते. मात्र, शनिवारी डिझेल संपल्याने काही ठिकाणच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यात अनेक ठिकाणची वाहतूक 3 दिवस बंद होती. आंदोलनकर्त्यांकडून काही ठिकाणी एस.टी. बसची जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याने एसटीची बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. यामुळे एसटीचे काही कोटींचे उत्पन्न बुडाले. परिणामी फंडिंग कमी असल्यामुळे याचा परिणाम डिझेल खरेदीवर झाला. अखेर फंड जमा झाल्यावर डिझेल मागवण्यात आले. 

शनिवारी नियमित फेर्‍यांपैकी 225 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. रत्नागिरी आगारातील डिझेलची कमतरता भरून काढण्यासाठी नजीकच्या लांजा, गुहागर आणि चिपळूण आगारांतून डिझेल मागवण्यात आले. हे डिझेल उपलब्ध झाल्यानंतर काही गावांसाठी फेर्‍या सोडण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी आठवडा बाजार असल्याने ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थ खरेदीसाठी आले होते. त्यांनासुद्धा एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्याने गावी परतण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागले.