Sun, Jun 16, 2019 12:41
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › रत्नागिरीतील पश्‍चिमाभिमुख सोमेश्‍वर मंदिर (Video) 

रत्नागिरीतील पश्‍चिमाभिमुख सोमेश्‍वर मंदिर (Video) 

Published On: Sep 07 2018 1:20AM | Last Updated: Sep 06 2018 8:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्‍वर हे आंबा, काजू, नारळीच्या बागांनी नटलेले गाव. या गावात सर्व धर्मीय लोकांची वस्ती आहे. या गावाचे वैशिष्ट्‍य म्हणजे चारशे-साडेचारशे वर्षापूर्वीचे प्रसिध्द सोमेश्‍वर मंदिर. हे मंदिर पश्‍चिमाभिमुख  असून, या मंदिराला पश्‍चिमेसह उत्तर-दक्षिणेलाही दोन दरवाजे आहेत. सभामंडप, मुख्यमंदिर, गाभारा व उत्तर-दक्षिणेचे सभामंडप असे पाच टप्प्यामध्ये हे मंदिर आहे. शक्‍यतो महादेवाची मंदिरे ही पूर्वाभिमुख असतात. सोमेश्‍वराचे मंदिर याला अपवाद आहे.  सभामंडपातील नंदीची भव्य मूर्ती येणार्‍या भक्‍तांचे  लक्ष वेधून घेते.

या मंदिराचा जीर्णोध्दार इ.स. १६८७ च्या दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी झाल्याची नोंद मंदिरातील एका खांबावर मोडी लिपीत असल्याची पहायला मिळते. भल्या मोठ्या जांभ्या चिर्‍याच्या शिलांचा वापर यावेळी करण्यात आला होता. मंदिराच्या छताचे लाकडी नक्षीकाम विलोभनीय असे आहे. मंदिरातील जमिनीवर आता लाद्या बसविण्यात आल्या असून, मंदिराच्या छताची कौले फक्‍त बदलण्यात आली आहेत. 

या मंदिरात सोमेश्‍वरासह गाभार्‍याबाहेर गणपती व कालभैरवाच्या मूर्ती विशेष लक्ष वेधून घेतात. सोमेश्‍वराची पिंड ही त्र्यंबकेश्‍वराच्या पिंडीप्रमाणे खोलगट आकाराची आहे. सोमेश्‍वर मंदिराच्या आवारातच भराडीन व रवळनाथाचे मंदिर आहे. देव सोमेश्‍वर मंदिरातील पाचशे वर्ष जुन्या सर्व पुरातन मूर्तीवर पाच महिन्यापूर्वी वज्रलेप करण्यात आला आहे.

सोमेश्‍वर मंदिराच्या समोर खोतांची नावे असलेल्या सहा दीपमाळा आहेत. सोमेश्‍वर हे सोहनी, सोहोनी, सोवनी, सोनी, केळकर, आठवले, नानीवडेकर या कुटुंबियांचे कुलदैवत आहे. रत्नागिरी शहरापासून सोमेश्‍वर हे गाव ११ किमीवर आहे. नाचणे-काजरघाटी गावामार्गे सोमेश्‍वर गावात जाता येते. मंदिरापर्यंत वाहने जाण्याची सुविधा आहे. एस.टी. बसेस, रिक्षा व खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत जाता येते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भक्‍त निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.