Mon, Nov 19, 2018 06:25होमपेज › Konkan › मासेमारीवर वॉच 

मासेमारीवर वॉच 

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:17PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : शहर वार्ताहर

मासेमारी बंदी सोमवारपासून लागू होत असली तरी जिल्ह्यातील 231 मच्छीमार बोटी समुद्रात 12 नॉटिकल मैल अंतराबाहेर मासेमारी करू शकणार आहेत. व्हेसल ट्रॅकिंग यंत्रणा बसवलेल्या नौकांना 12 नॉटिकल मैलांपुढे मासेमारी करण्यास मुभा आहे. या मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाला आठवडाभरात गस्ती नौका मिळण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 167 कि. मी.च्या समुद्रकिनार्‍यावर सुमारे 2600 बोटी मासेमारी करतात. त्यातील 1800 मच्छीमार बोटींना डिझेल अनुदान मिळते. गिलनेट, ट्रॉलिंग, पर्ससीन नेटने ही मासेमारी होत असते. 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही मासेमारी 1 जानेवारीपासून बंद होणार आहे. मात्र, ज्या मच्छीमार बोटींवर व्हीटीएस (व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा बसवण्यात आली आहे. या नौका 12 नॉटिकल मैलाच्याबाहेर मासेमारी करू शकणार आहेत. त्यांना तशी परवानगी दिली आहे.

व्हीटीएस यंत्रणेमुळे संबंधित बोट बंदरातून समुद्रात कुठे जात आहे, कुठे मासेमारी करीत आहे, याची माहिती मिळते. जिल्ह्यातील 231 नौकांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यातील 195 बोटींनी आवश्यक पूर्तता केल्याने त्यांना सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने एनओसी दिली आहे.