Sun, Feb 17, 2019 03:14होमपेज › Konkan › जनआंदोलनांमुळे जिल्हा ढवळतोय

जनआंदोलनांमुळे जिल्हा ढवळतोय

Published On: Feb 04 2018 11:25PM | Last Updated: Feb 04 2018 9:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

विविध आंदोलनांमुळे जिल्हा सध्या ढवळून निघत आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेवून अप्पर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार 13 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात  नाणार (ता. राजापूर) येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पास तेथील ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प तिथे होऊ नये, यासाठी ग्रामस्थ ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याचप्रमाणे जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे कामकाज होऊ नये यासाठी त्या भागातील ग्रामस्थ आंदोलने करीत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीननेट मासेमारीवर असलेल्या बंदीच्या विरोधात देखील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणासाठी भू-संपादनाचे काम चालू असून त्याकरिता देखील काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध आहे. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2018 या कालावधीत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातीस ऊरुस तसेच दि. 6 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत संत शिरोमणी गजानन  महाराज प्रगट दिन नाणीज येथे साजरा करण्यात येणार आहे.

मनाई आदेश लागू केल्याने शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किवा इतर शस्त्रे, हत्यारे किवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता किवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, सोंग आणणे, कोणतीही वस्तू किवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे, व्यक्ती अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात करण्यात आली आहे.  

 हे आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी व सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच या बाबींना लागू होणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.