होमपेज › Konkan › रेशनवर तूरडाळीचा अद्यापही पत्ता नाही

रेशनवर तूरडाळीचा अद्यापही पत्ता नाही

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:00PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानांचे डिजिटायझेशन करताना धान्यासह डाळीचेही वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार रेशनवरून गहू, तांदळासह तूर डाळीचे वितरण करण्यात येणार होते.  गेल्या नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयाची कार्यवाही नव्या वर्षातही कागदावरच  राहिली आहे.

शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने राज्यभरातील अंत्योदय प्राधान्य कुटुंबांमधील लाभार्थींना तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी पाच हजार 882 क्विंटलची मागणीही नोंदवली होती. मात्र, त्यानंतर अद्याप तूरडाळ आलीच नाही. एकंदरीत तूरडाळ वाटप आरंभासाठीदेखील तूरडाळ शासनाकडून उपलब्ध झाली नाही. नवे वर्ष उलटले तरी मंजूर डाळीची लाभार्थींना अद्याप प्रतीक्षाच आहे.

जिल्ह्यात 55 हजार 160 अंत्योदय योजनेचे तर प्राधान्य कुटुंब योजनेचे चार लाख 45 हजार 574 लाभार्थी आहेत. पाच लाख 734 कार्डधारक असून प्रतिकार्ड एक किलो या प्रमाणे हजार क्विंटल तूर डाळीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी लाभार्थींकरिता 5734 क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, तुरीचे अमाप उत्पादन झाल्याने हमीभावानुसार शासनाने मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केली होती. या तुरीची डाळ करून रेशन दुकानातून वाटप करण्याचा निर्णय गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आला होता.     

 निर्णयानुसार ही तूर बाजारात मिळणार्‍या भावापेक्षा कमी दराने म्हणजे 55 रुपये किलो दराने उपलब्ध होणार होती. मात्र, या योजनेतील लाभार्थ्यांकरिता धान्य मंजूर झाले तरी ते वितरण प्रणालीत असलेल्या दोषांमुळे अद्याप दुकानात पोहोचलेच नसल्याचे जिल्ह्यातील वास्तव आहे. सर्वत्र धान्याची मागणी असताना यातही केवळ गहू आणि तांदूळ मंजूर झाले. त्यामुळे  तूर, चना डाळी आणि साखरेसाठी लाभार्थ्यांना खासगी बाजारात चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे.