होमपेज › Konkan › भरधाव कंटेनरने तीन वाहनांना उडविले 

भरधाव कंटेनरने तीन वाहनांना उडविले 

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शुक्रवारी सकाळी हातखंब्याहून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कुवारबांव येथे समोरील तीन वाहनांना धडक देत अपघात केला. अपघातात महावितरणचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात  उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
निशाद अब्दुल रहेमान मडती असे अटक केलेल्या कंटेरनर चालकाचे नाव आहे.

तो कंटेनर (के.एल. 42-इ 3033) घेऊन केरळ येथून रत्नागिरी ‘एमआयडीसी’कडे येत होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर कुवारबांव येथे आला असता चालक निशादचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने आधी पुढे असलेल्या छोटा हत्ती या वाहनाला धडक देऊन समोरील एका दुचाकीलाही उडविले. अपघातानंतर ही दुचाकी कंटेनरखाली जाऊन अडकली होती. अपघातावेळी या दुचाकीवरील ‘महावितरण’चे दोन कर्मचारी रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. 

दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतरही न थांबता कंटेनरने या दुचाकीला तशीच फरफटत नेत पुढे एका झायलो गाडीला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघातामुळे कुवारबांव येथील मुख्य रस्त्यावर वाहतूक काही काळ खोळंबली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी कंटेनरचालक निशाद मडती याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.