Fri, Jul 19, 2019 22:22होमपेज › Konkan › चक्रीवादळाची भीती कायम

चक्रीवादळाची भीती कायम

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:27PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

‘ओखी’ चक्रीवादळाच्या भीतीने आणखी 28 परप्रांतीय मच्छीमार नौका राजापुरातील तुळसुंदे आणि रत्नागिरीतील जयगड, भगवती बंदरांत आश्रयासाठी आल्या आहेत. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून सोमवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, तुळसुंदे बंदरात 11, जयगड जेटीवर 13, तर भगवती बंदरात 4 नौका येऊन थांबल्या आहेत. तामिळनाडू, गुजरात, गोवा, केरळ राज्यांतील या नौका असल्याचे सांगण्यात आले.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण राज्यांमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. हे वादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्‍त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद, कृषी आणि मत्स्य व्यवसाय विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मोबाईल संदेशद्वारे त्या-त्या विभागाशी संबंधित कार्यप्रणालीबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद प्रशासनांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कृषी विभागानेही वादळाच्या पार्श्‍वभूमीवर फळझाडांना आधार देऊन काळजी घेण्याचे आवाहन मोबाईल संदेशांद्वारे केले आहे. तर मत्स्य व्यवसाय विभागाने वार्‍याच्या आणि त्याच्या वेगाची माहिती देऊन सावधगिरी बाळगण्यास सूचित केले आहे.

सोमवारी रत्नागिरीतील मिर्‍या आणि भगवती बंदरांत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यातील 28 मच्छीमार बोटी आश्रयासाठी आल्या होत्या. खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या या बोटींनी रविवारी ही बंदरे गाठली. या नौकांमध्ये 309 खलाशांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारीसुद्धा 28 बोटी तुळसुंदे, जयगड, भगवती बंदरात येऊन थांबल्या आहेत.