Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Konkan › जि. प. शाळांत साडेतेरा हजार मुले करणार ‘श्रीगणेशा’ 

जि. प. शाळांत साडेतेरा हजार मुले करणार ‘श्रीगणेशा’ 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 2018-19 या शैक्षणिक वर्षात पहिलीत 13 हजार 645 मुले श्रीगणेशा करणार आहेत. 15 जूनपासून शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार असून शाळांमध्ये मुलांचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना नियमित शाळेत शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के  उपस्थिती, टिकविणे व सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेचा ओढा वाढेल. या पार्श्‍वभूमीवर शाळेच्या प्रथम दिवशी आणि शाळापूर्व दिवशी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गावागावांत पहिली प्रवेशासाठी आणि पटसंख्या टिकविण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रयत्न करत होते. मे महिन्याची सुट्टी असतानाही त्यांचा उपक्रम सुरूच होता. शाळेच्या आधी एक दिवस सर्व शाळांमध्ये शैक्षणिक पदयात्रा, गृहभेटी करण्यात येणार असून यामध्ये शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचा सहभाग घेण्यात येईल. दाखलपात्र मुलांच्या घरी जाऊन मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी प्रोत्साहन

शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता, तसेच स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे. उच्च प्राथमिक शाळेत मीना राजू मंच सदस्य, सुगमकर्ता शिक्षक यांच्यामार्फत पटनोंदणी कार्यक्रमाबाबत जनजागृती करून मुलींना शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. अपंग समावेशित शिक्षण विषयांतर्गत विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत 

आणण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे समुपदेशन घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अद्यापही शाळेत दाखल न झालेली मुले तसेच सतत गैरहजर असणारी मुले आढळून आल्यास त्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन बालरक्षकांमार्फत करुन त्यांनाही शाळेत दाखल करण्यात येणार आहे.

शाळेचा पहिला दिवस 

शाळेच्या पहिल्या दिवशी आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते मुलांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळांमध्ये  शैक्षणिक पालखी  काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्व मुलांना शाळेत दाखल करण्याबाबतच्या घोषणा देण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वितरण, मुलांचे फुले व खाऊ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गोड पदार्थ वाटप केले जाईल. 

प्रभातफेरीमध्ये स्वागत

 मुलांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांचा सहभाग असेल. पहिल्या दिवशी शाळा पानाफुलांच्या तोरणांनी सुशोभित करुन मुलांचे स्वागत केले जाणार आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, समन्वयक, प्रोग्रामर, संशोधन सहाय्यक, गटशिक्षणाधिकारी, विषयतज्ज्ञ, केंद्रप्रमुख, तसेच पदाधिकारी, सदस्य यांनी शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.