Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Konkan › घरफोड्यांमधील चौघांच्या मुसक्या आवळल्या

घरफोड्यांमधील चौघांच्या मुसक्या आवळल्या

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये भरदिवसा घरफोड्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. 12) पेण येथील हॉटेल हिमगौरीनजीकच्या मोकळ्या जागेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम एक कार आणि सोन्याचे दागिने असा एकूण 8 लाख 18 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

ज्ञानेश्‍वर अप्पादुराई शेट्टी (वय 35, रा. गणराज पॅलेस, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू), नासिर खान इसाक खान पठाण (39, रा. नाझीया मंजील, नरीमलनगर, जालना), मुकेश भागोजी बाळसराफ (34, रा. आंबीवली, माणी, ता. कल्याण, जि. ठाणे, मूळ रा. जुन्नर, पुणे), रवी रामचंद्र शेट्टीयार (34, रा. वागळे इस्टेट रोड, शिवशक्तीनगर, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

चिपळूण व खेड पोलिस ठाण्यांच्या हद्दींमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. या घरफोड्यांचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक व अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची 2 पथके तयार केली होती. 

त्यातील एक पथक  रायगड, ठाणे, मुंबई या परिसरात पाठवण्यात आले होते. हे पथक मुंबई येथे जात असताना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे पेण जिल्हा रायगड या ठिकाणी हॉटेल हिमगौरीचे नजीक मोकळ्या जागेमध्ये एक काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी (एमएच-01-ए.एच-5864) त्यांना दिसून आली.गाडीमध्ये चारजण दिसत होेते. म्हणून काही काळ गाडीवर काही अंतरावरून वॉच ठेवण्यात आला होता. गाडीतील संशयितांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथक गाडीच्या दिशेने जात असताना ते गाडी घेवून पळून जाण्याच्या तयारी असताना थांबवून गाडीची झडती घेतली. त्यावेळी त्यांना ड्रायव्हर सिटच्या खाली स्क्रु ड्रायव्हर, अ‍ॅडजेस्टेबल पाना, कटावणी इत्यादी हत्यारे दिसून आली. तसेच गाडीमध्ये एक स्टील डबा व त्यामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. दागिने व हत्यारांबाबत त्यांचेकडे  चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे  दिली. परंतू पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चिपळूण येथील घरफोड्यांची कबुली दिली.

या टोळीने रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगडसह मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता असून रत्नागिरी जिल्हयातील चोरींबाबत अधिक तपास सुरु आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सपोफौ सुभाष माने, पो.हे.कॉ. संजय कांबळे, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, विजय आंबेकर, रमिज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.