Mon, Mar 25, 2019 13:59होमपेज › Konkan › पावणेदहा लाखांचे विदेशी मद्य पकडले

पावणेदहा लाखांचे विदेशी मद्य पकडले

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभाग खेडच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावच्या हद्दीत हॉटेल ओमेगा इनच्यासमोर एक ट्रक पकडून 9 लाख 70 हजार रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्‍त केले. या कारवाईत मद्यासह ट्रक मिळून सुमारे पावणेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक राजेंद्र भालेकर, अनुराग बर्वे, सावळाराम भुवड, गणपत जाधव व विजय सावंत यांनी ही कारवाई केली. श्रावण महिना सुरू होण्यास आठ दिवसांचा अवधी असल्याने गटारीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. गेले काही दिवस सातत्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विनापरवाना मद्य वाहतूक करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. रविवारी सकाळी निरीक्षक शंकर जाधव व त्यांचे सहकारी मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. यावेळी एका लाल रंगाच्या ट्रकचा त्यांना संशय आला. हा ट्रक थांबवून त्यांनी तपासणी केली असता गोवा-वेरणा येथून नवी मुंबई तळोजा येथे कंपनीचा माल घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, ट्रकच्या हौद्यातून मद्यासारखा विशिष्ट वास येत असल्याचे निरीक्षक जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीची तपासणी केली असता मद्याचे 202 बॉक्स आढळले. 750 मि.लि.च्या 2424 बाटल्या आढळल्या. या मद्याची किंमत 9 लाख 70 हजार 200 रूपये आहे. या मद्यासह 6 लाखांचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्‍त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालक तन्वीर इक्बाल शेख (सावंतवाडी, मोर डोंगरी, सिंधुदुर्ग) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.