Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Konkan › बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार

बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:20AMरत्नागिरी : शहर वार्ताहर

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या, वर्ग यांची अनुदान पात्र यादी त्यासंबंधी अनुदानाची 100 टक्के आर्थिक तरतूद करून जाहीर करावी व तात्काळ 100 टक्के पगार सुरू करावा या मागणीसाठी इ. 12 वी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीने व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. यासाठी दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कोकण विभागीय शिक्षण मंडळ रत्नागिरी येथे आंदोलन आयोजित केले आहे.

विनाअनुदानित शिक्षकांना नियमितपणे पगार सुरू होण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी उच्च माध्यमिकचे पुणे येथील प्रस्ताव मुंबईस मागवून घेऊन पुढील कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिले होते. तसेच अधिवेशनाच्या काळात अधिवेशन संपेपर्यंत याद्या घोषित करतो व मार्चमध्ये आर्थिक तरतूद करू, असे  सांगितले होते. पण अद्यापही यादी जाहीर झाली नाही. गेल्या 14 ते 15 वर्षांपासून एकही रूपया पगार न घेता हे शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली आहे.

अनुदानास पात्र यादीमध्ये सहभाग येण्यासाठी अनेक जाचक अटींची पूर्तता या शिक्षकांनी पूर्ण केल्या आहेत. मूल्यांकनास पात्र होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाची वैयक्तिक मान्यता पूर्ण असणे, रोस्टर पूर्ण असणे इ. गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक उच्च माध्यमिक शाळांनी अजूनही या अटी पूर्ण केलेल्या नाहीत.

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदान पात्र याद्या त्वरित घोषित कराव्यात व त्यासंबंधी 100 टक्के तरतूद करावी, यासंबंधी मागणी पूर्ण करण्याच अंतिम तारीख 21 ते 22 फेब्रुवारी रोजी दिलेलीच आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी रोजी कोकण विभागीय बोर्ड ऑफिस रत्नागिरी येथे दुपारी 3.30 वा. आंदोलन पुकारले आहे. तरी या आंदोलनासाठी सर्व शिक्षकांनी हजर राहावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.