Sat, Jul 20, 2019 11:01होमपेज › Konkan › राज्य ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी आ. सामंत

राज्य ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी आ. सामंत

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Sep 01 2018 12:02AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शिवसेना उपनेते व रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा असून, रत्नागिरीला गेल्या चार वर्षांपासून असलेली मंत्रिपदाची प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील सरकारी जागांवर हौसिंग डेव्हलपमेंट आता त्यांच्या अधिकारक्षेत्रात आली असून, त्याचा रत्नागिरी जिल्ह्याला फायदा होणार आहे.

राज्यातील मध्यम स्वरूपाच्या शहरांमध्ये गृहनिर्माणची मोठी गरज निर्माण झाली आहे. हे काम आ. उदय सामंत यांच्या अधिकारक्षेत्रात आले आहे. ग्रामीण भागांमध्येही सरकारी जागांवर घरे उभारण्यासाठी या पदाचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या अध्यक्षपदासमोर आव्हान असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गृहनिर्माण व क्षेत्र विकास म्हणावे तसे झालेले नाही. जिल्ह्यात आता 9 शहरे बनली असून, ती वेगाने विकसित होत आहेत. अशावेळी गृहनिर्माण व क्षेत्र विकासासाठी ना. सामंत यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून आ. सामंत यांना मंत्रीपदाची संधी हुलकावणी देत होती. आता या अध्यक्षपदाने जिल्हावासियांची मनिषा पूर्ण झाली असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.