होमपेज › Konkan › समुद्रातील मत्स्यसाठे शोधण्यासाठी ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’

समुद्रातील मत्स्यसाठे शोधण्यासाठी ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:42PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टी भागात असलेल्या सागरी समृद्धीला अधिक व्यापकपणे प्रस्तुत करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केलेला ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’ प्रकल्प  ‘इस्रो’च्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात उपग्रहाद्वारे सागरतळातील विश्‍वाचा धांडोळा घेण्यात येणार आहे. त्यानुसार सागरी व्यावसायिक मासेमारी आणि  पर्यटनाच्या दृष्टीने किनारपट्टी भागात असलेल्या प्रवाळ बेटांचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. 

कोकणातील सागरी मासेमारीवर असलेला कालावधी आणि  मर्यादांमुळे  आलेले संकट त्यामुळे कोकणचे अर्थकारण  धोक्यात आले आहे. या व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी मत्स्य विभागाने ‘इस्रो’च्या मदतीने उपग्रहाद्वारे सागरातील मत्स्यसाठे आणि त्यांची संवर्धनस्थळे निश्‍चित करण्यासाठी  ‘स्पेस अ‍ॅॅप्लिकेशन’ प्रकल्प प्रस्तावित केला आहे. कोकणातील मत्स्य हंगामाच्या बंदीच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची  चाचणी घेण्यात येणार आहे.

या प्रकल्पाद्वारे सागरी क्षेत्रात प्रामुख्याने संप्रेषण, नेव्हिगेशन आणि रीमोट सेन्सिंग गरजा पूर्ण करणार आहेत. या प्रकल्पात सागरतळाची भौगोलिक रचना, तेथील पर्यावरण आणि हवामानातील बदल, भौगोलिक समुद्रशास्त्र, जीवशास्त्रविषयक समुद्रशास्त्र, सागरी जीवसंवर्धन आदी भागातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.