Sat, Aug 24, 2019 23:43होमपेज › Konkan › ... म्हणूनच ठेवतात बाटलीत लाल रंगाचे पाणी!

... म्हणूनच ठेवतात बाटलीत लाल रंगाचे पाणी!

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:23PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशाल मोरे

रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशातच या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून इथल्या नागरिकांनी घराबाहेर बाटलीत लाल रंगाचं पाणी ठेवलंय. हे पाणी बघितल्यानंतर कुत्रे याठिकाणी येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे.

शहरातील अनेक इमारतींच्या प्रवेशद्वारावर तसेच घरासमोर लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या पहायला मिळतात. येणार्‍या जाणार्‍या अनेकांना याचे कुतूहल वाटत आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेतली असता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही अफलातून ‘आयडिया’ केल्याचे समजले. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील सर्वच भागात मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्याने ये-जा करताना ही कुत्री सरळ नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. रत्नागिरी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम गत महिन्यात राबवली होती. निर्बिजीकरण केल्यावर कुत्र्यांची नवी पिढी जन्माला येणार नाही. परंतु, कुत्र्यांची सध्याची संख्या आहे तेवढीच राहिली आहे. त्यांचा उपद्रवही कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीच नामी शक्‍कल लढवित या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी घरासमोर लाल रंगाचे पाणी असलेल्या बाटल्या ठेवून कुत्र्यांना अटकाव करण्यात येत आहे.

कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. हे पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ते घराच्या दाराजवळ ठेवल्यास कुत्रे याठिकाणी येत नाहीत, असा तर्क नागरिकांनी काढला असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे. 

या बाटल्या पाहून कुत्रे पळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रीही त्या बाटल्यांना किंवा त्यातील लाल रंगाला पाहून घाबरत असावेत, असा काहींचा कयास आहे.