Sun, Apr 21, 2019 04:19होमपेज › Konkan › कोकणामधील शिमगोत्सव जगभरातून अनुभवता येणार!

कोकणामधील शिमगोत्सव जगभरातून अनुभवता येणार!

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 11:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-पुण्याचा गणेशोत्सव, दहीहंडी कोल्हापुरातील    दसर्‍याबरोबरच आता कोकणातील शिमगोत्सवही जगाच्या कानाकोपर्‍यातून कुठूनही  अनुभवता येणार आहे. कोकणातील 
शिमगोत्सवासह विविध देवांच्या पालख्या,  यात्रांची माहिती जगाच्या नकाशावर यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी)   खास संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर कोकणातील शिगोत्सवाबरोबरच पारंपरिक कलांचा आविष्कारही अनुभवायला मिळणार आहे. या ऑनलाईन माहितीच्या आधारे पर्यटकांना कोकणातील पर्यटन क्षेत्रांकडे आकर्षित करण्यासाठी इत्थंभूत माहितीचा खजिनाच ऑॅनलाईन करण्यात आला आहे. 

कोकणातील शिमगोत्सवांना, यात्रांना आगळेवेगळे महत्त्व आहे. मात्र, त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी ‘एमटीडीसी’कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळ्यात अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने लाखो भाविक येथे भेट देतात.  त्याचप्रमाणे संगमेश्‍वरातील शिंपणे, सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीची यात्रा, मार्लेश्‍वरची यात्रा, कुणकेश्‍वराची यात्रा, हातिसचा उरुस यासह विविध उत्सवांची माहिती या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकणातील गावाकडील या सणांचे महत्त्व देशी, तसेच परदेशी पर्यटकांनाही अनुभवता यावे आणि त्यातून पर्यटन व्यवसायाची वृद्धी व्हावी, या उद्देशाने ही माहिती ‘एमटीडीसी’ने ऑनलाईन केली आहे. शिमगोत्सव सातासमुद्रापार नेणार्‍या या संकेतस्थळावर गावांमधील कृषी पर्यटन केंद्राची माहिती अपलोड केली आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी  आरिफ शाह यांनी दिली.