Fri, Apr 26, 2019 09:39होमपेज › Konkan › कोकणातील पर्यटनासाठी घ्या भरारी सी-प्लेनने!

कोकणातील पर्यटनासाठी घ्या भरारी सी-प्लेनने!

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:07PMरत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

कोकणातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, सिंधुदुर्गातील तारकर्ली तसेच रायगडमधील हरिहरेश्‍वर येथून मुंबई-जुहू अशी ‘सी-प्लेन’ची योजना सुरू करण्यात येण़ार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र पर्यटन विकास’ (एमटीडीसी)चे  विभागीय व्यवस्थापक अभिषेक चव्हाण यांनी दिली. यासाठी शासनाने खासगी विमान वाहतूक कंपनीशी करार केला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची ही हवाई सेवा येत्या काही महिन्यांतच सुरू होण्याची शक्यता आहे.

गेली अनेक वर्षे कोकण विभाग हा राज्याच्या पर्यटनात केंद्रबिंदू ठरला आहे. अनेक देशी आणि परदेशी पर्यटक कोकणात पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. यासाठी ‘एमटीडीसी’तर्फे विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवासाच्या सुलभ सुविधांसह पर्यटकांच्या मूलभूत सुविधांचा आराखडा  शासनाने तयार केला आहे. त्याला मान्यता देताना आगामी काही महिन्यांत कोकणातील सागरी किनारी वसलेल्या पर्यटन केंद्रांना जोडण्यासाठी ‘सी-प्लेन’ सेवा कोकणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात येणार्‍या पर्यटकांना अत्यंत कमी वेळेत कोकणलाही भेट देता येणार आहे.

ही सेवा कोकणातील विशेषत: किनारपट्टी भागात वसलेल्या पर्यटन केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या गणपतीपुळेची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या सिंधुदुर्गातील तारकर्लीचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

रायगड किल्ल्यासह रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. हरिहरेश्‍वर येथे ही सेवा उपलब्ध करून देताना राज्याच्या ऐतिहासिक वैभवांमध्ये गणल्या जाणार्‍या रायगड किल्ल्याकडे जाण्यासाठीही येथे  पर्यायी प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर या योजनेची येत्या ऑगस्टमध्ये चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ‘एमटीडीसी’ने स्पष्ट केले आहे.