Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Konkan › ‘रत्नागिरी-8’चा आता सहा राज्यांत डंका

‘रत्नागिरी-8’चा आता सहा राज्यांत डंका

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 11:28PMरत्नागिरी : विशाल मोरे

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने भाताचा नवा वाण ‘रत्नागिरी-8’ संकरित केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील सहा राज्यांसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणातून हेक्टरी 50 ते 58 क्विंटल उत्पादन मिळू शकणार असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रोफेसर (सीएएस) व पैदासकार डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 
विद्यापीठांतर्गत शिरगाव येथे  कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. या केंद्रात भात बियाणांच्या नवनवीन जाती तयार करण्यात येतात. केंद्रात नवीन वाण तयार झाल्यानंतर त्यातून नर-मादी शोधून त्यातून नवीन बियाणांची निर्मिती केली जाते. कृषी संशोधन केंद्राने तयार केलेल्या आजवरच्या अनेक जाती शेतकर्‍यांपर्यत पोहोचल्या. कोकणातील जमिनीचा पोत ओळखून अधिक उत्पन्न देणार्‍या वाणाची निर्मिती होत असल्याने हे केंद्र शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे. 

कृषी संशोधन केंद्राने गेली तीन वर्षे चाचणी घेऊन ‘रत्नागिरी 8’ हा भाताचा नवीन वाण विकसित केला आहे. आय आर 64 आणि कर्जत 184 या भाताच्या जातींमधून ही नवी जात तयार करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीच याचे देशपातळीवर प्रसारण करण्यात आले. ही जातीच्या दाण्याचा प्रकार हा मध्यम बारीक या आकाराचा आहे. याचे पीक कापणीयोग्य होण्यासाठी 135 ते 138 दिवसांचा कालावधी लागतो. तांदळाची उत्कृष्ट प्रत, कडा करपा रोग, खोड कीडा व पाने गुंडाळणार्‍या अळीस प्रतिबंध अशी या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.