Tue, May 21, 2019 18:35होमपेज › Konkan › योगामध्ये रत्नकन्यांचा बोलबाला

योगामध्ये रत्नकन्यांचा बोलबाला

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:25PMरत्नागिरी : योगेश हळदवणेकर

आज जागतिक योग दिवस!  योगासन क्षेत्राचा उल्लेख झाला की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणार्‍या रत्नकन्या पूर्वा आणि प्राप्ती या किनरे भगिनींचे नाव प्रथम घ्यावे लागेल. लहान वयातच योगाचे धडे देणार्‍या या भगिनींनी देशाचे नाव वेळोवेळी उंचावलेले आहे. पूर्वा हिने वयाच्या आठव्या वर्षी योगाची सुरुवात केली, तर तिच्या पावलावर पाऊल ठेवून प्राप्तीनेही योगामध्ये आपली चुणूक दाखवून दिली. 

मानवी जीवनाचा योगाशी अनन्यसाधारण संबंध आहे. शरीर, मन, बुद्धी, चित्त, आत्मा या सर्वांच्या शुद्धीसाठी व ‘हे विश्‍वचि माझे घर’ ही संकल्पना मुलांमध्ये रुजण्यासाठी योग खूप आवश्यक आहे. योगाच्या बाबतीत जग भारताकडे विश्‍वगुरू म्हणून पाहू लागला आहे. भारताला विश्‍वगुरू बनविण्यामध्ये जसा प्रतिष्ठितांचा संबंध आहे, तसाचा नवीन पिढीचा हातभार लागत आहे. यात रत्नकन्या पूर्वा आणि प्राप्ती या दोघींचाही तितकाच हातभार आहे.

पूर्वा हिने दुसरी इयत्तेपासून म्हणजेच वयाच्या आठव्या वर्षापासून योगासनाची तालीम करण्यास सुरुवात केली. तिच्यातील लवचिकता पाहून ती ज्या ‘जीजीपीएस’ या शाळेत शिकत होती तिथे तिच्या शिक्षिका सौ. मलुष्टे यांनी योगासनांमध्ये पुढे येण्यास सुचवले व त्यानंतर चिपळूण येथील कोवॅस व्यायामशाळेचे शिक्षक मंगेश खेडेकर आणि मधुकर पवार यांचे मार्गदर्शन घेत पूर्वा योगामध्ये विविध पातळ्यांवर यश मिळवत गेली. याच दरम्यान रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा कार्यालयात योग शिक्षक रविभूषण कुमटेकर यांची नियुक्ती झाली आणि कुमटेकर यांच्यासारख्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली पूर्वा आणि प्राप्ती यांची वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत वडील शिवराम किनरे व आई पूजा किनरे यांचे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे लाभलेे.

नियमित अभ्यासातील गुणवत्ता कायम ठेवून योगासने या क्रीडा प्रकारात भरारी घेणारी पूर्वा आणि प्राप्ती हे आदर्शच म्हणावे लागतील. पूर्वा हिने फेब्रुवारी 2013 मध्ये 11 ते 14 वयोगटातील योगा फेडरेशन ऑफ इंडिया पंजाबच्या स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल 36 वर्षांनंतर पहिले सुवर्णपदक प्राप्त करून दिले. त्यानंतर सलग दुसर्‍या वर्षीही तिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेनंतर तिची 2013 साली पॅरीस येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. रत्नागिरीतून या स्पर्धेसाठी जाणारी पहिली मुलगी ही पूर्वा ठरली. शैक्षणिक आलेखही तिचा उंचावलेलाच राहिला आहे. दरवर्षी उज्ज्वल यश मिळवतानाच शिष्यवृत्तीत जिल्हास्तरावर चौथी तर राज्यस्तरावर नववी आली. दहावी आणि बारावीतही हा आलेख उंचावताच राहिला.

आपल्या वडिलांकडून क्रीडा वारसा घेतलेल्या या किनरे भगिनींना योगासनाची आवड तसेच उंची आणि शरीरयष्टीमधील साम्य असल्याने आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर या प्रकारांतही दोघींनी पदके प्राप्त केली. पूर्वा आजच्या घडीला अवघड अशी दीडशे आसने करते. तर तिच्या पावलावर पाऊल ठेवून प्राप्तीही योगासनामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. दोघींनी मिळवलेल्या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ऑलिम्पिकमध्ये योग स्पर्धा हवी 

योगासन स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय पातळीवर अत्यंत पारदर्शकता असून, आसने योग्य करणार्‍यांचीच निवड केली जाते. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आला असाल तरी तुम्हाला पुन्हा जिल्हा पातळीपासून खेळावे लागते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरील खेळण्याचा मानस पूर्वाने बोलून दाखवला. या क्रीडा प्रकाराचा ऑलिम्पिकमध्येही समावेश असावा, अशी इच्छा पूर्वा हिने व्यक्त केली.