Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Konkan › रेशन दुकानदार होणार सिलिंडर तपासनीस

रेशन दुकानदार होणार सिलिंडर तपासनीस

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:54PMरत्नागिरी : प्रतिनिधी

घरगुती गॅसचा होणारा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी आाणि घरगुती सिलिंडरच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी  शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात तपासणी मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेची जबाबदारी आता रेशन दुकानदार संचालकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना गरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावरही तपासणी अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे. या अतिरिक्त कामामुळे आधीच मेटाकुटीला आलेले रेशनदुकानदार आता आणखीनच संतापणार आहेत. आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी  रेशन दुकानांची डिजिटाझेशन प्रक्रिया जिल्ह्यात जवळपास पूणर्र् झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत रेशन दुकानदारांनी विविध सर्वेक्षणे आणि कागदी लढाया केल्यानंतर थोडी उसंत मिळाल्याबरोबरच डिजिटाझेशनचे प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती.

रेशन दुकानांवर वितरण प्रणालीबरोबरच अन्य सुविधाही मिळणार असल्याने त्याचीही जबादारी दुकानदारांच्याच माथी मारण्यात आली होती. त्यानंतर रेशन दुकानांमध्ये बँकेच्या सुविधाही  उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांची या सेवा पुरवताना दमछाक होऊ लागली आहे. अशातच रेशन दुकानावरून धान्य पुरवठ्याबाबत अनिश्‍चितता असल्याने तेथेही दुकानदारांना  आंदोलनेे करावी लागली. 

आता दुकानदारांना घरगुती गॅसच्या वितरण प्रणालीवर तपासनीस म्हणून नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक स्वरुपात वापर केला जातो, यावर दुकानदारांनी लक्ष ठेवायचे आहे. तपासणी करून असे प्रकार संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत. शिधापत्रिकेवर असलेली सिलिंडरची नोंद आणि गॅस एजन्सीतून करण्यात येणारा पुरवठा यावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आता नव्या जबाबदारीच्या चाहुलीने दुकानदार धास्तावलेले आहेत. घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असली तरी या मोहिमेची सर्व सूत्रे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्ष तपासणी आणि अहवाल देण्याची कामगिरी रेशन दुकानदारांवर आहे.