Tue, Mar 19, 2019 15:38होमपेज › Konkan › राणेंमध्येच सरकारविरोधात जाण्याची धमक

राणेंमध्येच सरकारविरोधात जाण्याची धमक

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 11:09PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी 

कोकणचे नेते नारायण राणे यांच्या भीतीमुळेच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रिफायनरी विरुद्ध संघर्ष करण्यासाठी मुंबईतील अशोक वालम यांना राजापुरात पाठवले आहे. सरकारच्या विरोधात जाण्याची धमक केवळ राणे यांच्यात आहे. यामुळे नाणार येथील प्रकल्पबाधीत ग्रामस्थ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देतील, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी केले.

सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात सभा घेतली तर ती कोणीही घेईल. पण इतर ठिकाणी सभा घेणे हे एक आव्हान आहे. हे आव्हान राणे यांनी स्वीकारले असून महाराष्ट्रातील दौर्‍यानंतर ते कोकणात सभा घेणार आहेत. यानंतर पक्षाची उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. नाणार येथे येणारा पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रदूषणकारी आहे. त्याला आमचा विरोध आहे. आम्ही या विरोधातील लढा सनदशीर मार्गाने लढत आहोत. आम्हाला तेथील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. जैतापूर प्रकल्प उद्ध्वस्त करू म्हणणारे नाणार प्रकल्पाला पाठिंबा दर्शवत आहेत. काही लोकप्रतिनिधी केवळ दिखाव्यासाठी विरोध दर्शवित आहेत. पण आम्हाला येथील बागायती जमिनी वाचवायच्या आहेत. कोकणच्या निसर्गावर आघात करणारा प्रकल्प आम्हाला नको.

अन्य पक्षातील नाराजांबरोबर आमच्या चर्चा सुरू असून लवकर ही नाराज मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करतील. राजापूर आणि लांजा येथील दौर्‍यात अन्य पक्षातील नाराज कार्यकर्त्यांशीही आमची चर्चा झाली आहे. 

नारायण राणे यांनी जिल्ह्यात पक्षाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे. पक्षवाढीसाठी योग्य नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाई भोळे, नित्यानंद दळवी, मेहताब साखरकर, अशोक वाडेकर, सचिन आचरेकर, तन्मय सावंत आदी उपस्थित होते.