होमपेज › Konkan › रत्नागिरीत बंद शांततेत

रत्नागिरीत बंद शांततेत

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 9:54PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी क्रांतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत मोर्चा काढ ून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या.  एस.टी. बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे बाजारपेठ सुरू राहूनही ग्राहकांचा मात्र शुकशुकाट होता. एस.टी. बंदचा सर्वाधिक फटका व्यापार्‍यांना बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्तर रत्नागिरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दक्षिण रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

राज्यभर गुरुवारी आंदोलन असल्याने जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल परिसरात मराठा बंधूभगिनी एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन, मराठा बांधव मुख्यमार्गावरुन माळनाका जेलनाका, सिव्हिल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केशवराव इंदुलकर, प्रतापराव सावंतदेसाई, अविनाश सावंतदेसाई, सुधाकर सावंत यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती.

युवावर्गाने शहरामधून मोर्चा काढण्याचे नियोजन केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने परवानगी दिली. या मोर्चाच्या पुढे  व मागे पोलिस कर्मचार्‍यांचा ताफा होता. जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा एसटी स्टँण्डमार्गे रामआळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, स्वा. सावरकर चौकात आला. या ठिकाणी स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तांबटआळी, धनजीनाका मार्गे, भाजीमंडई, झारणीरोड, आठवडा बाजार, एसटी स्टँण्डमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन समाप्त झाला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक शिंरीष सासने, अनिल विभूते, अरविंद बोडके यांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला.  

रत्नागिरीत शुकशुकाट

गुरुवारी पहाटेपासूनच एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती.  रत्नागिरीत चार दिवसांपूर्वी झालेल्या मराठा आंदोलनाला व्यापार्‍यांनी पाठिंबा देत, बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यामुळे गुरुवारी व्यापार्‍यांनी व्यवसाय सुरु ठेवले. त्यातच महसूल कर्मचार्‍यांचाही बंद असल्याने ग्रामीण भागामधूनही शासकीय कामकाजासाठी नागरिक फिरकले नाहीत. ग्राहकच बाजारात न फिरकल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मराठा बंदच्या पार्श्‍वभूमीवर काही शाळांनी सुट्टी दिली होती तर काहींनी स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे अशा सूचना दिल्या होत्या. शहरातील रिक्षा व्यवसाय सुरु होता. मात्र, बंदचा फटका रिक्षा व्यवसायालाही बसला.

खेडमध्ये मोर्चा

एक मराठा लाख मराठा, विषय गंभीर मराठा खंबीर, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय रहाणार नाय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.. अशा घोषणांनी खेड शहर दुमदुमले. हजारोंच्या संख्येने शिस्तबद्धपणे शहरातील महाडनाका येथील एस.टी.मैदानात जमलेल्या सकल मराठा समाजबांधवांनी शहरातील विविध भागांतून मोर्चा काढला. या निमित्त खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

गुहागर पडले ओस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा संघटनेने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये गुहागर तालुक्याने उत्स्फूर्त सहभाग घेतला. तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, पेट्रोल पंप ओस पडले होते. मराठा समाजाच्या या बंदमध्ये शृंगारतळी बाजारपेठेतील सर्व दुकानदारांनी बंद पाळून सहभाग घेतला. तर मुस्लिम समाजाचा जास्त सहभाग असलेल्या या बाजारपेठेत जमातुल्ला मुस्लिमीन संघटनेने मोर्चाला पाठिंबा दर्शविला. 

सावर्डेत 54 गावे मोर्चात

चिपळूण तालुक्यातील  सावर्डे परिसरात 54  गावांत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कडकडीत बंद पाळण्यात आला.  सावर्डेसह वहाळ, निवळी, पालवण, असुर्डे येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या, तर सावर्डे बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला.

मंडणगडात संमिश्र प्रतिसाद

मराठा मोर्चाच्या वतीने राज्यभरात बंदची हाक देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंडणगडात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठांमधील काही दुकाने बंद तर काही उघडण्यात आली होती. एसटी वाहतूक पूर्ण बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय झाली.

राजापूर, लांजा, संगमेश्‍वर संमिश्र प्रतिसाद

राजापूर, लांजा, संगमेश्‍वर या तालुक्यांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.  राजापुरात ग्रामीण भागात जोरदार प्रतिसाद लाभला. लांजा आणि संगमेश्‍वरमध्येही प्रतिसाद मिळाला. देवरूखमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट होता. एकूण जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला.