Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Konkan › याड ‘मिशन’

याड ‘मिशन’

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:11PM- समीर जाधव, चिपळूण 

अवघ्या तीन वर्षांच्या छकुलीला घेऊन रांगेत उभ्या असणार्‍या रितेशला पाहिले. त्याच्या जोडीला अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन रांगेत होतेच...अजूनही निट बोलायला चालायला न येणार्‍या मुलांच्या शिक्षणाची पालकांना इतकी घाई का, असा सहज मनात प्रश्न आला. आणि नेमका याचाच फायदा उठविणार्‍या संस्था किंवा खासगी नर्सरिज (शि-शू विहार) आज चौकाचौकात निर्माण होत आहेत. त्यावेळी एकेकाळची बालवाडी आठवली.आजची शिक्षण व्यवस्था आणि तत्कालीन व्यवस्था यात तुलनात्मक विचार सुरु झाला. पाल्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या अकाली वयात पालकांचे  चाललेले हे ‘याड-मिशनच’ म्हणावेसे वाटते.

आज शिक्षणाचे खासगीकरण झाले आहे. अर्थात त्याला बाजारूपणा आला आहे. गुणवत्तेपेक्षा ज्याच्याकडे दाम त्याला चांगली शाळा मिळणारच असा आता अलिखित संकेत तयार झाला आहे. खासगी शाळांमध्ये तर शि-शू विहारसाठी अगदी 10 हजार ते 40 हजार रूपये प्रवेशासाठी मोजावे लागत आहेत. ज्या मुलांना खेळण्यासाठी वेळ द्यायचा ...पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबरीने घालवायचा अशा वेळीच शाळेत पाठविण्याची घाई होत आहे. हजारो रुपये भरून असे प्रवेश घेतले जात आहेत. प्रवेशासाठी पालक हातात पैसे घेऊन रांगा लावत आहेत. इतकेच काय त्या चिमुकल्यांच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत. हा त्या बालपणावर अन्यायच नाही का ? इंग्रजी माध्यमाची  तर अलिकडे लाटच आली आहे. शेजार्‍याने आपल्या मुलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले मग आपण का नाही घालायचे...? असा हट्ट घरा घरातून होतो आणि अगदी खिशाला परवडत नसेल तरी...घरी इंग्रजी शिकविता येत नसले तरीही ‘इंग्लिश मीडियम’असा नवा फंडाच झाला आहे. यात पालक आणि बालकांचीही ससेहोलपट होत आहे.

आता इंग्रजी माध्यमाच्या शाळाना पसंती मिळत आहे. या शाळा विनाआनुदानित तत्वावर चालविल्या जातात. त्यामुळे अर्थात पालकांच्या देणगीवरच त्या चालतात. त्यामुळे हजारो रुपये भरून प्रवेश मिळतो. या प्रवेशासाठी चार-आठ दिवस रांगेत राहून प्रवेश मिळविला जातो. त्यामुळे अशा शाळाही वाढू लागल्या आहेत. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळांवर संक्रांत येत आहे. तेथील पटसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. या मराठी शाळेत शिकलेले पण डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रशासकीय अधिकारी आणि अगदी शास्त्रज्ञ पण झाले आहेत. पण आता या रितेशला कोण समजाविणार...? त्याचे शिक्षणही गावाकडच्या मराठी शाळेतच झालेलं. वयाची सात वर्षे पूर्ण झाल्यावर शाळेत गेलेला तो रितेश एका कंपनीत उच्च पदावर कामाला आहे. पत्नी पण प्राथमिक शिक्षिका आहे. पण तो  आपल्या छकुलीला मात्र अवघ्या तिसर्‍या वर्षी शाळेत घालायला निघालाय...हा त्या बालपणावर अन्याय नाही का..? ज्या हातांनी पालकांचे बोट धरून चालायचे.. बागडायचे ...तेच हात पेन किंवा पेन्सिल धरण्यासाठी प्रवृत्त करायचे ...पण आज हे सार्वत्रिक झाले आहेे.

आज सर्व पालकांना शिक्षणाचे ‘याड’लागलंय. त्यामुळेच अगदी कोवळ्या वयातच मुलांना शाळेत पाठविण्याचा अट्टहास होत आहे. बरं शाळेतून आल्यावर पुन्हा ‘ट्युशन’आहेच. कारण शाळेत शिकविलेले पुरे होत नाही आणि घरी कोणाला काही अभ्यास घेता येत नाही. या ओझ्याखाली बालपण चिरडले जात आहे. त्यामुळे अनेक बालमानस शास्त्रज्ञ किमान सहा ते सात वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलांना शाळेत पाठवा, असा सल्ला देतात. पण, सगळीकडे  ‘याड मिशन’ सुरु असताना रितेश मागे का राहील. तो पण आपल्या मुलीला घेऊन मुलाखतीला अर्थात ‘याड मिशनला’आलाय असो...!