Sun, May 26, 2019 19:20होमपेज › Konkan › आजपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

आजपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:26PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शनिवारपासूनच सुरू होणार आहे. प्रथम जनजागृती करून व्यापारी, विक्रेते, नागरिकांना पुरेशी संधी दिल्यानंतरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शनिवारी आठवडा बाजार व मार्केट परिसरात तपासणी करून प्लास्टिक पिशव्या घाऊक पद्धतीने विकण्यासाठी येणार्‍यांचा आणि ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या सापडतील त्या जप्त केल्या जाणार असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शासनाने प्लास्टिक व थर्मोकोल वापराच्या बंदीवर शिक्कामोर्तब केले आहे. शनिवारपासून त्याची अंमलबजावणीही होणार आहे. स्वच्छता अभियानांतर्गत प्लास्टिक बंदीबाबत ‘रनप’ने पुढाकार घेतला होता. परंतु, आता शासनाने पूर्णपणे बंदी घातल्याने दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. प्रारंभी कारवाईसाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक पथक शहराच्या वरच्या भागात आणि दुसरे शहराच्या खालच्या भागात कार्यरत राहणार असल्याचेही नगराध्यक्ष पंडित यांनी यावेळी सांगितले.

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेली दोन्ही पथके आठवडा बाजार आणि मार्केट परिसरात सकाळी 8 वाजल्यापासूनच तपासणी सुरू करणार आहेत. अशा बाजारांच्या ठिकाणी सकाळच प्लास्टिक पिशव्यांचे घाऊक विक्रेते येतात त्यांच्याकडील साठा जप्त केला जाणार आहे. त्याचबरोबर विक्रेते, व्यापारी यांच्याकडेही तपासणी करून प्लास्टिक सापडले तर ते जप्त करण्यात येणार आहे. त्यानंतर ध्वनिक्षेपकावरून प्लास्टिक बंदीची जनजागृती करून पुरेपूर संधी दिली जाणार आहे.

कारवाईची सुरूवात केल्यानंतर 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी अपेक्षित सहकार्य करून कारवाई टाळावी, असे आवाहनही नगराध्यक्ष पंडित यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेविका शिल्पा सुर्वे उपस्थित होते.