Thu, Apr 18, 2019 16:29होमपेज › Konkan › गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त : खा. राऊत

गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त : खा. राऊत

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील, असे खा. विनायक राऊत यांनी सांगितले. काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे भरले जाणार आहेत. पाऊस कमी आल्यानंतर हे काम सुरू होईल आणि गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असे त्यांनी सांगितले. खासदारांनी बावनदी, संगमेश्‍वर ते आरवलीपर्यंत प्रवास करून खड्ड्यांची पाहणी केली. वाकेड ते झारापपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल, अशा गतीने काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे जांभ्या दगडाने भरले गेले ती तात्पुरती उपाययोजना होती. प्रत्यक्षात काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे भरले जाणार असून, त्यासाठी 3 कोटी रूपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. खड्ड्यांबाबतची ओरड सुरू झाल्यानंतर खा. राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. बनगोसावी, उपविभागीय अभियंता प्रमोद मडकईकर आणि चौपदरीकरण करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते किरण ऊर्फ भैय्या सामंत, वीराज चाळके, प्रभारी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे आदी उपस्थित होते.

खा. विनायक राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणीवेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार कंपनीला तातडीने खड्डे दुरूस्ती करून घेण्याच्या सूचना केल्या. काही झाले तरी गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचे आणि पुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वाससुद्धा व्यक्त केला. वाकेड ते झारापपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल, अशा गतीने काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग विभागात अधिकारी वर्ग कमी असला तरी अपेक्षित क्षमतेने काम केले जात असल्याचे सांगून या विभागातील अभियंत्यांचे कौतुक केले. आपण स्वत:ही प्रतिदिन चारवेळा संपर्क साधून अधिकार्‍यांशी चौपदरीकरणाबाबत आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.