Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Konkan › परराज्यातील नौका मिर्‍या बंदरात 

परराज्यातील नौका मिर्‍या बंदरात 

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:23PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडू, कर्नाटकसह केरळ राज्यांमधील 28 मच्छीमार  नौका येथील मिर्‍या तसेच भगवती बंदरात आश्रयाला आल्या आहेत. या नौकांमध्ये 309 खलाशी असून ते सर्वजण सुखरूप आहेत.  बंदरात आश्रयाला आलेले हे सर्व खलाशी सुखरूप असल्याचे त्या-त्या राज्यांच्या मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवस सतर्कतेचा इशारा देऊनही अनेक स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असल्याचे समजते. इशारा देऊनही दुर्घटना घडली तर अशा मच्छीमार बोटींना कोणतीही भरपाई मिळत नाही. तरीही जीव धोक्यात घातला जातोय.
ओखी चक्रीवादळाने तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये अनेकांचे जीव गेले. भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीलाही धोका असल्याचा इशारा दिला. दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन केले. सतर्कतेचा हा इशारा देऊनही अनेक स्थानिक मच्छीमार बोटी घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून 
मासेमारी बंदी पर्ससीन नेट नौका कशा प्रकारे पाळतील याचा अंदाज येत आहे. 

एकीकडे स्थानिक सतर्कतेचा इशारा जुमानत नसतानाच खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या बोटींना सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतर त्या आश्रयासाठी रत्नागिरीतील मिर्‍या बंदर येथील बंदरात येऊन थांबल्या आहेत. एकूण 28 बोटी असून त्यातील 23 बोटी तामिळनाडूच्या, 3 केरळच्या आणि 2 कर्नाटकच्या बोटी आहेत. या सर्व मच्छीमार बोटींमध्ये 309 खलाशी असून त्यांच्या राज्याच्या जॉईंट कमिशनरना त्यांची सुखरूपता कळवण्यात आली असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. 

पुढील 48 तास इशारा ओखी वादळामुळे समुद्री वार्‍याचा वेग ताशी 65 ते 75 कि.मी. असल्याने समुद्रात जाणे धोक्याचे झाले आहे. अशा स्थितीत अजूनही पुढील 48 तास मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच काही किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. दोन दिवसांपासून थंडावलेल्या मासेमारीने मासळीचे उत्पादन घटले असून, याचा परिणाम बाजारात उपलब्ध न झाल्याने मासळीचे दर गगनाला भिडले 
आहेत.