Sun, Apr 21, 2019 14:02होमपेज › Konkan › निकृष्ट पोषण आहाराचे पितळ उघडे

निकृष्ट पोषण आहाराचे पितळ उघडे

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:01PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शासनाच्या शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत रत्नागिरीत पुरवण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे पं. स.सदस्य गजानन पाटील यांनी मंगळवारी झालेल्या मासिक सभेत उघडकीस आणले. त्यानंतर याची पाहणी न करणार्‍या अधीक्षकाला  धारेवर धरण्यात आले. अधीक्षकाला शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी धारेवर धरत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचे आदेश दिले.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेजे सभागृहात झाली. यावेळी उपसभापती शंकर सोनवडकर, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सदस्य उत्तम मोरे, सुनील नावले, प्राजक्‍ता पाटील, स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारावरून ही सभा गाजली. सदस्य गजानन पाटील यांनी कुवारबांव आणि मिरजोळे शाळेतील मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोषण आहाराचे निकृष्ट धान्य शाळांना वाटप झाल्याची माहिती दिली. त्याचा जाब पोषण आहार अधीक्षक संतोष कटाळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपण गेले 15 दिवस रजेवर होतो असे सांगितले. मात्र, पाटील यांनी ही रजा अधिकृत आहे का? असे विचारले असता ते निरूत्तर झाले. पाटील यांनी निकृष्ट पोषण आहार पुरवठा करणार्‍या ठेकेदारावर फौजदारी झाली पाहिजे, अशी मागणी केली. हरभर्‍यामध्ये काड्या, टोके पडलेली मुगडाळ अशा प्रकारचे धान्य वितरित झाल्याची माहिती दिली. याबाबत कटाळे यांना याची तपासणी करण्याची जबाबदारी तुमची असून, याची पाहणी केली का? अशी विचारणा केली. त्यावर कटाळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पाटील यांनी धारेवर धरले.

ही सभा संपल्यानंतर सभापती विभांजली पाटील यांच्या दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाटील यांनी सांगितले की, शासन ठेकेदाराला उत्कृष्ट प्रतीचे धान्य पुरवण्यासाठी त्या दराचे पैसे देते. मात्र, कोल्हापुरातील रामदास जाधव हा ठेकेदार सुमार दर्जाचे धान्य पुरवतो. काहीवेळा तपासणी करण्यात येणारे धान्य चांगले दाखवले जाते. तर पुरवठा करण्यात येणारे धान्य खराब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक कटाळे यांच्याकडे गोडावूनची आत्ताच्या आत्ता पाहणी करण्याची मागणी केली असता याचे गोडावून रत्नागिरीत कोठे आहे, हे त्यांनाच माहिती नव्हते. कोल्हापूरचे ठेकेदार रामदास जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी शाळांना धान्य वितरित करण्यात आले असून गोडावूनमध्ये धान्य शिल्‍लक नसल्याने कामगार गावी गेले असल्याचे सांगितले.

त्यानंतर सर्वजण शिक्षणाधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेले असता शिक्षण सभापतींच्या दालनात शिक्षण समितीची बैठक सुरू होती. या बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती बेटकर यांनी अधीक्षक कटाळे यांना फैलावर घेतले. या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करत नवा ठेकेदार नेमावा आणि या ठेकेदाराचे कोणतेही बिल अदा करू नये, असा ठराव या सभेत करण्यात आला. 

यावेळी येथे उपस्थित असणारे जि. प. सदस्य बाळकृष्ण जाधव यांनीही कटाळे यांची कानउघडणी करत तुम्ही कशा पद्धतीने काम करता, अशी विचारणा केली. यावेळी शिक्षणाधिकारी देविदास कुल्हाळ आणि लेखाधिकारी आर. बी. शिंदे यांनी सांगितले की, 27 ऑगस्ट रोजी आम्ही या धान्याची तपासणी केली. हे धान्य निकृष्ट असल्याबाबतचे ठेकेदाराला पत्र पाठवले आहे.