Mon, May 27, 2019 09:15होमपेज › Konkan › पोर्टलवर अर्ज न भरल्यास ऑफलाईन बदली 

पोर्टलवर अर्ज न भरल्यास ऑफलाईन बदली 

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली असून, यावर्षी सुमारे पावणेचार हजार शिक्षकांच्या बदल्या होतील. बदली पात्र, बदली अधिकार पात्र शिक्षकांनी वेळेत पोर्टलवर अर्ज भरले नाहीत तर त्यांच्या बदल्या ऑफलाईन करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. 

संवर्ग-1 मधील अर्ज पोर्टलवर भरण्यासाठी 10 एप्रिल व संवर्ग-2 मधील शिक्षकांसाठी 11 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. अर्ज न भरल्यास त्यांच्या बदल्या ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर ऑफलाईनने होणार आहेत. 

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया 1 मेपर्यंत करावी लागणार आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. संवर्ग-1 मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत लॉगईन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. 

बदलीसंदर्भात अर्ज भरताना कोणतीही समस्या असेल तर त्यासंदर्भात अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या आहेत. संवर्ग-2 मधील अर्ज 11 एप्रिलपर्यंत भरावयाचे आहेत. ऑनलाईन प्रक्रियेत ज्या शाळा शिल्लक राहतील त्यामध्ये त्यांना समुपदेशनाने नियुक्‍ती दिली जाणार आहे. ती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच केली 

जाईल, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. शिक्षकांनी शाळेचा पासवर्ड इतरांना देऊ नये. हेतुपुरस्सर चुकीची माहिती भरून इतरांचे अर्ज भरले जाण्याच्या तक्रारी आल्या असल्याने ही काळजी घ्यावी, असे झाल्यास सर्वप्रथम संबंधित शाळेला जबाबदार धरण्यात येणार आहे. बदलीचा अर्ज कोणी कोठून भरला, याची सविस्तर माहिती समजणार आहे. गैरकृत्य करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सक्‍त सूचना ग्रामविकास विभागाकडून दिल्या आहेत.