Fri, Jul 19, 2019 07:48होमपेज › Konkan › पुढील आठवडाभर मुसळधारच

पुढील आठवडाभर मुसळधारच

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मध्यंतरी गायब झालेला पाऊस आता जिल्हाभर सर्वदूर व्यापला असून चालू आठवड्यात पावसाने सातत्य ठेवले आहे. शुक्रवारीही जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी दिवसभरात  पावसानेे 70 मि.मी. च्या सरासरीने  झोडपून काढताना आतापर्यंत 725  मि. मी.ची मजल गाठली आहे. 26 जूनपर्यंत पाऊस मुसळधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे किनारी गावांना आणि दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

शुक्रवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. पावसाचा जोर वाढवल्याने अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक बाधित झाली.  शहरानजीक असलेल्या मिरजोळे, पोमेंडी आणि सोमेश्‍वर भागात खाड्यांचे पाणी शिरल्याने अनेक भागांत  जनजीवन विस्कळीत झाले. तसेच रत्नागिरी शहरातही वर्दळीच्या भागात पाणी साचल्याने शहरातील जनजीवनावरही परिणाम झाला. रत्नागिरी तालुक्यासह गुहागर आणि दापोली तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. गुहागर तालुक्यात किनारी भागासह ग्रामीण भागातही पाणी अनेक रस्ते बाधित झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. दापोलीतही जोरदार  पावसाने झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान झाले. 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 70.22 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. यामध्ये मंडणगड 40 मि. मी.  दापोली128, खेड 80, गुहागर 146, चिपळूण 54,  संगमेश्‍वर 40 रत्नागिरी 92  आणि लांजा  तालुक्यात 22 मि. मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सर्वाधिक पाऊस गुहागर तालुक्यात तर कमी पर्जन्यमान लांजा तालुक्यात नोंदविले. जोरदार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत घरांच्या पडझडीसह सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी  सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात घरांच्या पडझडीत तीन घरांचे सुमारे 44 हजारांचे नुकसान झाले. राजापूर तालुक्यात  घरावर झाड पडल्याने घराचे सुमारे 20 हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 22 ते 26 जून या कालावधीत अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.