होमपेज › Konkan › रत्नागिरीत ‘राष्ट्रवादी’चा निषेध मोर्चा

रत्नागिरीत ‘राष्ट्रवादी’चा निषेध मोर्चा

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 10:47PMरत्नागिरी : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे  महागाईचा भडका उडाला असून महागाईने सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झसले आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणांचा निषेध करीत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील मारुती मंदिर येथून बैलगाडीने मोर्चा काढण्यात आला. निघालेल्या या मोर्चात शासनाचा निषेध करण्यात आला.मोर्चात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

इंधनाच्या किमतीत होणार्‍या दरवाढीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर कर लावून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. इंधनदरवाढीचा फटका अन्य जीवनावश्यक वस्तूंनाही बसत असून महागाईने सर्वसामान्यांचे आयुष्य मेटाकुटीला आले आहे. याला जबाबदार असणार्‍या राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांचाही सहभाग  होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, माजी नगराध्यक्ष उमेश  शेट्ये, समिरा सावंत,  शहराध्यक्ष अभिजीत गुरव  आदी  सहभागी झाले होते. 
यावेळी शब्बीर मुर्तुझा, कुमार शेट्ये यांसह उमेश शेट्ये यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावेळी निवासी उपजिल्हाधधिकारी अभिजीत घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. महागाईच्या गर्तेत लोटणार्‍या या सत्ताधारी शासनांना सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी तीव्र आंदोंलन राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.