Tue, Jul 16, 2019 21:54होमपेज › Konkan › मच्छीमार नतमस्तक!

मच्छीमार नतमस्तक!

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:45PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेले अडीच महिने अतिवृष्टी व उधाणामुळे खवळलेल्या अरबी समुद्राला श्रीफळ अर्पण करून मच्छीमार आणि नागरिकांनी नारळी पौर्णिमा सण शनिवारी उत्साहात साजरा केला. दर्याचा राजा असलेल्या मच्छीमारांबरोबरच व्यापारी बांधवही या वेळी सागराला श्रीफळ अर्पण करून नतमस्तक झाले. 

या निमित्ताने नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने मांडवी जेटी परिसर फुलून गेला होता. दुपारी 3 वाजल्यापासून नागरिक नारळ अर्पण करण्यासाठी मांडवी जेटीवर येत होते. या पारंपरिक उत्सवाचे क्षण अनुभवण्यासाठी शहराच्या कानाकोपर्‍यातून भाविक सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत किनार्‍यांवर हा जल्लोष रंगला होता. यावेळी ‘हे समुद्र देवा, माझा मालक त्याची नाव मी तुझ्या कुशीत सोडत आहे, माझा घर-संसार दर्यावरच आहे, माझ्या मालकाचे रक्षण कर, वादळी वार्‍यापासून माझ्या धन्याला सुखरूप ठेव, माझा संसार तुझ्या पोटात असलेल्या मासळीच्या धनावर चालतो, त्यामुळे वर्षभर भरभरून मासळीचं दान दे, असे साकडे मच्छीमार महिलांनी समुद्राला घातले. पावसामुळे उधाणलेल्या समुद्राला शांत होण्याचेही आवाहन केले.

यावेळी समुद्रात टाकण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच धावपळ पाहायला मिळाली. सायंकाळी मांडवी जेटीवर भाविकांची एकच गर्दी उसळली होती. 

 रत्नागिरीत मांडवी बरोबरच भगवती बंदर, मिर्‍याबंदर, भाट्ये, कर्ला, जुवे येथेही सागराला नारळ अर्पण करण्यात आला. चिपळुणात वाशिष्ठी नदी काठावरदेखील गोवळकोटवासीयांनी  नदीला नारळ अर्पण करुन नारळी पौर्णिमा साजरी केली.