Wed, Mar 20, 2019 23:09होमपेज › Konkan › परस्पर भूखंड वाटप; तत्कालीन प्रादेशिक अधिकारी निलंबित

परस्पर भूखंड वाटप; तत्कालीन प्रादेशिक अधिकारी निलंबित

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:58PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे (एमआयडीसी) भूखंड परस्पर वितरित केल्याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे. या तिन्ही ठिकाणच्या सुमारे 160 भूखंडांचे त्यांनी परस्पर वाटप केले होते. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या भूखंड वाटपाला स्थगिती दिल्यानंतर संबंधित उद्योजकांनी तक्रारी केल्या. 
आ. हुस्नबानू खलिफे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, निलंबित प्रादेशिक अधिकारी सध्या नंदूरबारमध्ये पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

रत्नागिरी, चिपळूण, कुडाळच्या औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील सुमारे 160 भूखंडांचे वाटप झाले. सुमारे 2 वर्षांपूर्वी प्रकाश आघाव पाटील प्रादेशिक अधिकारी असताना त्यांनी हे भूखंड परस्पर वितरित केले होते. प्रत्यक्षात महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांसह इतर वाटप समितीतील अधिकार्‍यांच्या बैठकीत भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु, प्रादेशिक अधिकार्‍यांनी ही कार्यवाही करून न घेता परस्पर भूखंड वाटप केले होते.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या ही कार्यपद्धती निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या भूखंड वाटपाला स्थगिती देऊन ते ताब्यात घेण्याबाबतची महामंडळाची नोटीस संबंधित उद्योजकांना बजावली होती. भूखंड ताब्यात मिळाल्यानंतर अनेक उद्योजकांनी बांधकाम करून घेतले. त्यात ही नोटीस आल्यानंतर घबराट पसरली होती. याबाबतच्या तक्रारी होऊ लागल्या. आ. हुस्नबानू खलिफे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. सभापती माणिकराव ठाकरे यांनी याबाबत चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन त्या उद्योजकांनाही दिलासा दिला.
महामंडळाकडे ज्या उद्योजकांनी भूखंडाचे पूर्ण पैसे भरले होते आणि ज्यांना बांधकाम करण्याची परवानगी मिळाली होती त्यांचे भूखंड त्यांना मिळतील, असे आश्‍वासन विधान परिषदेत मिळाले.
 त्याचबरोबर तत्कालीन प्रादेशिक अधिकार्‍याची चौकशी होऊन कारवाई करण्याचे आश्‍वासनही सभापतींनी दिली. त्यानुसार तत्कालीन प्रादेशिक अधिकारी आणि सध्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना निलंबित केल्याचे आदेश शासनाने दिले आहेत.