Sun, Jul 21, 2019 12:56होमपेज › Konkan › ट्रक टर्मिनस पाणी यावर जोरदार चर्चा

ट्रक टर्मिनस पाणी यावर जोरदार चर्चा

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:47PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी सेना गटनेते बंड्या साळवी यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था निदर्शनास आणून दिली. प्रभागातील नगरसेवकांसोबत पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पॅचिंग करून घेतले जाईल, असे उत्तर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिले. राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी ट्रक टर्मिनसचा विषय गाजवला. पाण्याच्या प्रश्‍नावरही जोरदार चर्चा झाली.

शहर स्वच्छतेसाठी ‘रनप’ प्रशासन जशी तत्परता दाखवत आहे तशी काळजी रस्त्यांबाबतही घेतली जावी. कर देणार्‍या शहरवासीयांना ही सुविधा दिलीच पाहिजे. बहुतांश रस्ते नादुरुस्त आहेत, असे सांगत नगरसेवक साळवी यांनी काहीही करा आणि जनतेला रस्ते सुस्थितीत करून द्या, अशी मागणी केली. सभेसमोरील विषय पत्रिकेवरील विषयांना प्रारंभ होण्यापूर्वीच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिला. उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर यांनी तर ‘रनप’ प्रशासनाला सावध करताना सांगितले की, रस्ते, पाणी योजना होणार नसेल तर शहरवासीयांनी कर भरणा न करण्याचा विचार केला तर जबाबदार कोण? पाणी योजनेचा विषय आल्यानंतर भाजपचे नगरसेवक मुन्‍ना चवंडे, राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर, अपक्ष नगरसेवक विकास पाटील यांनी आमचा पाणी योजनेला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. नगर परिषदेच्या फंडातून केला जाणारा अतिरिक्‍त खर्च करण्याचा ठराव रद्द करणार असाल तर पाणी योजनेच्या सर्व तक्रारी मागे घेतो, असे सांगितले.