Thu, Aug 22, 2019 08:42होमपेज › Konkan › दस्तावेज गहाळ होण्याच्या भानामतीवर रत्नागिरीच्या नगराध्यक्षांचा उतारा

दस्तावेज गहाळ होण्याच्या भानामतीवर रत्नागिरीच्या नगराध्यक्षांचा उतारा

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:07PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या कामकाजातील कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार लवकरच इतिहासजमा होणार आहेत. नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून नव्याने दाखल होणार्‍या कागदपत्रांचे किंवा दस्तऐवजाचे स्कॅनिंग पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कागदपत्रे गहाळ करून हेतू साध्य करण्याचा बेत आखणार्‍यांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी हे चतुराईचे प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल 1876 साली रत्नागिरी नगरपरिषद अस्तित्वात आली. 142 वर्षे झालेल्या या नगरपरिषदेतील कार्यपद्धती गेल्या काही वर्षांत पार बदलून गेली. सत्ताधार्‍यांकडून विरोधकांच्या कामांची कागदपत्रे किंवा प्रस्ताव गहाळ करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे प्रकार घडले आहेत. 

पकाय आहे गौडबंगाल?  

ज्या कागदपत्रांमुळे सत्ताधारी किंवा विरोधकही अडचणीत येण्याची शक्यता असते ती कागदपत्रेसुद्धा अनेक वेळा ‘रनप’ तून हरवली आहेत. पोलिसांपर्यंत तक्रारीसुद्धा गेल्या आहेत. परंतु, या भानामतीवर अजिबात उपाय लागू पडत नव्हता. त्यामुळे दस्तावेज गहाळ होण्यापाठीमागचे गौडबंगाल काय असावे. याची उत्सुकता होती.

‘रनप’च्या काही लाभदायक टेबलवर येणार्‍या प्रस्तावांच्या बाबतीतही असेच घडत होते. एखाद्या प्रस्तावात फायद्याचे काम करून घ्यायचे असेल तेव्हा त्या प्रस्तावातील पुराव्याची कागदपत्र हरवत होती. कामाला वेळ होत असल्याचे पाहून प्रस्तावधारक आपला तोटा करून घेण्यास तयार होत होता. त्यानंतर लगेचच गायब झालेली कागदपत्रे मिळून प्रस्ताव मंजूर होत होता. आता हे प्रकार बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण ‘रनप’च्या सर्व दस्ताऐवजाचे स्कॅनिंग 99 टक्के पूर्ण झाले आहे. महिनाभरात हे काम पूर्ण झाल्यावर कोणी कोणती कागदपत्रे दिलीआहेत ही माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.